औरंगाबाद- नवरात्र आणि दिवाळी विशेष रेल्वेसाठी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबादने नांदेड विभागाला पर्यायाने मराठवाड्याला ठेंगा दाखवला. मराठवाड्यासाठी नवरात्रात बिकानेर व जम्मूतावीसाठी विशेष रेल्वे सोडण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या आहेत.
नवरात्रामध्ये नांदेड बिकानेर रेल्वे सोडण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी औरंगाबादेत येऊन आश्वासन दिले होते, परंतु नव्यानेच घोषणा करण्यात आलेल्या नवरात्र व दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमधून मराठवाड्याला पूर्णत: डावलण्यात आले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद झोनतर्फे घोषित करण्यात आलेल्या चाळीस विशेष रेल्वेंमध्ये नांदेड विभागातून जाणारी एकही रेल्वे नाही. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांमध्ये चांगलाच आक्रोश निर्माण झाला आहे. घोषित करण्यात आलेल्या सर्व विशेष रेल्वे चेन्नई, विशाखापट्टणम, मछलीपट्टणम, हावडा, विजयवाडा, तिरुपती, संत्रागच्छी, लिंगमपल्ली, गुलबर्गा, यशवंतपूर, संबळपूर, भुवनेश्वर, जयपूर, हुबळी आदी ठिकाणांसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद-तिरुपती (07405) या रेल्वेस ऑक्टोबर 3, 10, 17, 24 मध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
वैष्णोदेवी भक्तांसाठी नवरात्रात सुविधा व्हावी यासाठी नांदेड-जम्मूतावी व नांदेड-बिकानेर रेल्वे सुरू करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक ओमप्रकाश वर्मा, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे संतोषकुमार सोमाणी, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब आदींनी केली होती. रेल्वेने यापूर्वी नांदेड-बिकानेरची घोषणा बजेटमध्ये केली होती; परंतु उपरोक्त रेल्वे हिंगोली, वाशीमने पळवल्याने मराठवाड्याची निराशा झाली. दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभाग वगळता इतर पाचही विभागांना प्राधान्य दिले आहे.त्यामुळे यावेळच्या नवरात्र व दिवाळीला घोर निराशा झाली आहे. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी नांदेड-बिकानेर रेल्वेसाठी न्यायालयात धाव घेण्यासंबंधी जाहीर केलेले आहे. त्यांनी उपरोक्तप्रकरणी रेल्वे बोर्डास कायदेशीर नोटीस पाठवून जाब विचारला आहे. मराठवाड्याला एकही विशेष रेल्वे न दिल्यामुळे आता यासंबंधीही न्यायालयात जाब विचारला जाणार असल्याचे आमदार बंब यांचे निकटचे कार्यकर्ते राजकुमार सोमाणी यांनी सांगितले.