आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड- मृगनक्षत्रात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला गती दिली मात्र त्यानंतर अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी जवळपास सतरा दिवस उलटले तरी पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे अंबड तालुक्यातील अर्ध्या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठवाड्यात वाऱ्याचा वेग आणि दिवसा उन्हाच्या तीव्रतेमुळे जमिनी काेरड्या झाल्या असून त्या तडकण्याचा प्रकार वाढला आहे. विहिरीतील जलसाठाही खालावत चालला आहे. अर्ध्या तालुक्यात चिंतेचे वातावरण तर अर्ध्या तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यातच शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत तर दुसरीकडे बँक पीककर्ज पुनर्गठण करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. काही भागात पाऊस पडल्याने पेरण्या झाल्या नाहीत म्हणून शेतकरी चिंतेत आहेत तर काही ठिकाणी पाऊस पडला पेरण्या झाल्या मात्र पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

अनियमित पावसामुळे सर्वदूर दुबार पेरणीच संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे.या संकटाची चाहूल लागल्याने कृषी विभागाच्या वतीने दुबार पेरणीचे बियाणे,खताच्या उपलब्धतेसाठी हालचाली सुरू केल्या अाहेत.

अंबड तालुक्यात आतापर्यंत ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी पावसाची स्थिती मात्र समाधानकारक नाही. यावर्षी जूनला पावसाची सुरुवात वेळेवर झाली. मात्र सलग आठ दिवस काही ठिकाणी पडला तर काही भागात द्याप उन्हाळयासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली नसल्याने भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आठवडाभर काही भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्याची लगबग करून पेरण्या करून घेतल्या. वरुणराजाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागले डोळे
कर्जातच जीवन

शेतकरीजन्मापासून मरेपर्यंत कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रकार वाढले आहेत. कारण गेल्या पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे शेतात जेवढे लावले तेवढेही हातात येत नाही त्यामुळे पुन्हा बँकेचे कर्ज,सावकराचे कर्ज घ्यावे लागते मात्र असे किती दिवस चालणार आहे.असा सवाल अंबड तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.

७ जूनला पाऊस आला म्हणून यावर्षी पाऊस चांगला होईल या आशेने पेरणी केली होती मात्र आठ दिवसांनंतर पाऊस जो थांबला जो आजपर्यंत पडला नाही. त्यामुळे फक्त आभाळाकडे डोळे करून त्याची प्रतीक्षा करीत आहोत पेरणी, बी-बियाणांसाठी घरातील वस्तू गहाण ठेवून खरेदी केले. आता तर घरातही नाही आणि पदरातही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ''- परमेश्वरकाळे, शेतकरी, अंबड

पीककर्जांचे पुनर्गठन
राज्यशासनाने शेतकऱ्यांच्या पीककर्जांचे पुनर्गठन करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीही बँक व्यवस्थापकांना कडक सूचना केल्या आहेत. मात्र अंबड तालुक्यातील एकही बँक कर्जाचे पुनर्गठन करत नाही याकडे कोणाचेही लक्ष नाही.तक्रार करावी तर कोणाकडे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांनी जुने पीककर्ज भरल्याशिवाय नवीन पीककर्ज मिळणार नाही असा पवित्रा बँकांनी घेतला आहे. शेतकरी अाधीच संकटात सापडला असताना तो पीककर्ज भरण्यासाठी पैसे आणणार कुठून असा प्रश्न शेतक ऱ्यांतून उपस्थित होत आहे.