आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spacial Interview Of Shripad Subnis On Indian Present Situation, Divya Marathi,

विशेष मुलाखत- जगाला वाचवायचे असेल तर बुद्ध, गांधी पाहिजेतच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मी कोणत्याही एका पक्षाचा नाही, भाजपचा दलाल नाही; पण पंतप्रधान मोदी मला भावतात. मोदींकडे मी हिंदुत्ववादी म्हणून पाहत नाही. गोध्रा हत्याकांडावेळच्या मोदींशी माझे पटत नाही, पण विकसित झालेले पंतप्रधान मोदी मला अधिक भावतात. ते ज्या पद्धतीने गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींचे विचार घेऊन जगभर भारताची प्रतिमा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करीत आहेत ते योग्यच आहे. जगाला वाचवायचे असेल तर बुद्ध आणि गांधी पाहिजेतच, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी दिव्य मराठी कार्यालयात प्रदीर्घ मुलाखतीत व्यक्त केले. साहित्य संस्कृती, स्पृश्यास्पृश्य भेदभाव, सध्याचे राजकारण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांची भूमिका कशी चुकीची आहे, यावर त्यांनी आपले स्पष्ट विचार मांडले.
चळवळीतूनच साहित्यिक झालो...
मीअनेक चळवळीत कामे केली. ते करताना साहित्याकडे कसा वळलो ते कळलेही नाही.कॉम्रेड शरद पाटलांच्या एका भाषणाचा मी जळगावात प्रतिवाद केला. त्यांच्या भाषणाची मांडणी मला पटत नव्हती. त्यांचा ब्राह्मणी -अब्राह्मणी सिद्धांत मी खोडून काढला होता. गंगाधर पानतावणे यांच्या अस्मितादर्श संमेलनाच्या निमित्ताने तो वाद सुरू झाला. माझ्या मुलाखती त्या वेळी वर्तमानपत्रांतून आल्या अन् तेथूनच लिखाणाला सुरुवात झाली. माझ्या निषेधार्थ एक सभा त्या वेळी आयोजित केली गेली. तेथे समाजातील अनेक दिग्गज लोक होते. त्या वेळी माझ्या निषेधाएेवजी अभिनंदन केले गेले.

वडिलांनीदिले बाळकडू
हडोळीहे माझे मूळ गाव. तेथे ११० एकर शेती होती. वडील क्रांतिकारक होते. त्या वेळी हैदराबाद मुक्तिसंग्रामात त्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवला. आमच्या घरी त्या वेळी ३०० बंदुका होत्या. आम्ही ब्राह्मण असलो तरी सर्व समाजात राहत होतो. वडिलांनी कधी जातिभेद शिकवलाच नाही. बिनजातीयवादी संस्कार वडिलांनीच केले. नंतर श्रीपाद डांगे, एस.के.लिमये यांच्या विचारांनी भारावलो.आणीबाणीच्या काळातही काम केले. नरहर कुरुंदकर माझे गुरू. मार्क्स, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास केला. नवा आंबेडकरवादही मांडला. मी बाबासाहेबांवर पीएचडी केलीय. जानवे तोडून ब्राह्मण्यावर मात केली, पण संतसाहित्यातला सेक्युलरवाद मला आवडतो. ज्ञानेश्वरीतील पसायदानाचे सूत्र मी विसरू शकत नाही.

नवेमोदी भावतात, त्यांची दिशा योग्यच
जगालावाचवायचे असेल तर भारतीय भगवान गौतम बुद्ध अन् महात्मा गांधी यांचे विचार गरजेचे आहेत. मोदींनी नेमके हेच केले आहे. संघीय मोदींचे मॉडेल विकसित झाले आहे. भारताचा सेक्युलरवाद ते या स्वरूपाने पटवून देत आहेत. संघाची भूमिकादेखील डावी असू शकते. मी डावा नाही, मी उजवा नाही, मी सेंटरमध्ये राहून भूमिका पटवतोय. हा सेक्युलरवाद मोदी, बुद्ध आणि गांधी विचारांच्या माध्यमातून जगाला पटवून देत आहे. जगाला कोण वाचवणार? गोळवलकर, सावरकर , हेडगेवार, वाचवणार काय? तर बुद्ध आणि गांधी यांचेच विचार वाचवू शकतात. म्हणून संघीय मोदींच्या मॉडेलमध्ये विकसित भारतीयत्व आहे. यात बुद्ध आणि गांधीच्या विचारांची बेरीज आहे.

मानवीसंस्कृती असेपर्यंत विषमता राहणार...
हजारोवर्षांपासून देशात विषमता आपण पाहतो आहोत. हा गरीब, हा श्रीमंत असा भेद करतो. साहेबाला जास्त पगार, झाडू मारणाऱ्याला कमी पगार. ही विषमता नाही का.. हा गोरा, हा काळा म्हणून आपण विषमताच दाखवतो ना... पण आपण स्पृश्य-अस्पृश्य हा भेद मिटवलाच की! आता कुठे दिसतो हा भेद. तशीच उरलेली विषमता पुढचा समाज मिटवेल. पुढच्या प्रगत समाजात तोही भेद नसेल; पण विषमतेचा संघर्ष मानवी संस्कृती असेपर्यंत सुरूच राहील.

नेमाडेंचाविचार निराशावादी...
भालचंद्रनेमाडोंनी जातीय व्यवस्थेचे समर्थन केले, यावर तुमचे काय मत आहे? या प्रश्नाचे सविस्तर उत्तर सबनीस यांनी दिले. ते म्हणाले, मला त्यांचे विचार मान्य नाहीत. पण प्रत्यक्षात त्यांनी समर्थन केले असेल असे मला वाटत नाही. त्यांचे हे विचार निराशावादी आहेत एवढेच मी म्हणेन.

अध्यक्षांच्याखुर्चीचा मान राखा..
मागच्याअधिवेशनात संमेलनाध्यक्ष भाषणाला उठल्यावर त्यांच्या जागेवर राजकीय व्यक्ती बसल्या. समोरची सर्वच जागा त्यांनी व्यापून घेतली. तसे होता कामा नये. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा अकरा कोटी मराठी भाषकांचा प्रतिनिधी आहे. त्याचा मान राखलाच गेला पाहिजे.

जिल्हा पातळीवर साहित्य संमेलने आता व्हावीत..
साहित्यसंमेलने झाली पाहिजेत. सरकारच्या वतीने साहित्य संमेलनासाठी २५ लाखांची मदत मिळते. ही रक्कम खूप कमी आहे इतर राज्ये मात्र दोन कोटी रुपये देतात. आपल्या राज्य सरकारनेही तेवढेच पैसे साहित्य संमेलनाला दिले पाहिजेत. जिल्हापातळीवर आता संमेलने व्हावीत, अशी मागणी मी करणार आहे.

पुरस्कार परत करणाऱ्यांनी आधी संवाद साधवा..
सरकारशीसंवाद साधता साहित्यिकांनी डायरेक्ट संघर्षावर उतरणे चुकीचे आहे. मी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. पण पुरस्कार परत करण्याएेवजी संवादाची भूमिका घेतली तर बरे झाले असते. सरकारचीही भूमिका चुकली. साहित्यिकांनी विवेक सोडला तसा सरकारनेही सोडला. मंत्र्यांनी कडक भाषेत त्यांच्यावर टीका करायला नको होती. लेखकांची वाटणी करणे चुकीचेच आहे हे विघातक आहे.
नवे मोदी मला भावतात.. साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याआधी विवेक दाखवायला हवा.. राज्य सरकारने संमेलनाला २५ लाख नव्हे, कोटी द्यावेत : श्रीपाल सबनीस