आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेनच्या शैक्षणिक पद्धतीचे अनुकरण करणार, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्पेन येथील ओव्हिडिओ आणि सँडिओगो विद्यापीठांसोबत सामंजस्य करारामुळे युरोपीय संशोधन, शिक्षण पद्धतीचे आपल्याला अनुकरण करता येईल. विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांचे ‘एक्स्चेंज’ या निमित्ताने होणार असल्याचा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बोलून दाखवला.
सहा दिवसांचा युरोप दौरा आटोपून सोमवारी (१६ फेब्रुवारी) ते विद्यापीठात दाखल झाले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
स्पेन येथील विद्यापीठाचे संशोधक आणि प्राध्यापकांकडील माहिती, ज्ञान आणि तंत्रज्ञान, शिष्यवृत्तीचे आदान-प्रदान करण्यासाठी कुलगुरू बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे फेब्रुवारी रोजी स्पेनला रवाना झाले होते. सहा दिवसांत त्यांनी स्पेन येथील ओव्हिडिओ आणि सँडिओगो या दोन विद्यापीठांना भेटी दिल्या.
ओव्हिडियो विद्यापीठाशी नव्याने करार करण्यात आला असून सँडिओगो विद्यापीठासोबत याधीच करार करण्यात आला होता, तो आता २०१८ पर्यंत वाढवण्यात आला आहे.
ओव्हिडिओ विद्यापीठाला सुमारे चारशे वर्षांचा इतिहास असून जगातील दोनशे विद्यापीठांपैकी एक आहे. तेथील कुलपती व्हिन्सेटो गोटर सांतामारिया आणि डॉ. चोपडे यांच्यादरम्यान १३ फेब्रुवारी रोजी करार झाला. आगामी शैक्षणिक सत्रापासून तेथील तज्ज्ञ प्राध्यापक येथील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विद्यापीठात वास्तव्याला राहणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात येथील विद्यापीठाचे ज्येष्ठ संशोधक प्राध्यापक तेथील विद्यार्थ्यांचे वर्ग घेणार आहेत. शिवाय ओव्हिडिओचे कुलगुरू विद्यापीठाच्या वर्धापनदिनी (२३ ऑगस्ट २०१५) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे कुलगुरू म्हणाले.

विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील मरिन विभागालाही स्पेनचे प्राध्यापक भेटी देणार आहेत. सँडिओगो विद्यापीठाचे कुलपती प्रोफेसर कार्लोस सालगाडो आणि कुलगुरू पाब्लो टॅव्हाडो अँटेलो यांच्या स्वाक्षरीने कराराला मुदतवाढ देण्यात आली आहे. २०१२ मध्ये हा करार करण्यात आला होता.

याविभागांना दिल्या भेटी

स्पेनयेथील विद्यापीठांतील विविध विभागांना कुलगुरूंनी भेटी दिल्या आहेत. गणित, सांख्यिकीशास्र, रसायन तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, जैव तंत्रज्ञान, मरिन सायन्स, जेनिटिक्स इंजिनिअरिंग, अर्थशास्त्र, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, विधी, ह्युमन जिओग्राफी, मॉलिक्युलर बायोलॉजी, स्थापत्य अभियांत्रिकी, इंग्रजी आणि शिक्षणशास्त्र विभागाचेही त्यांनी अवलोकन केले आहे.

आशिया खंडातील प्रादेशिक केंद्र विद्यापीठात होणार

स्पॅनिशसरकारमधील इंटरनॅशनल ऑफिसर प्रोफेसर एनरिक लोपेज व्हेल्कोना यांची ११ फेब्रुवारीला कुलगुरूंनी भेट घेतली. त्या वेळी प्रोफेसर लोपेज यांनी आशिया खंडातील राष्ट्रांसाठी प्रादेशिक कार्यालय स्थापनेचा मनोदय कुलगुरूंना बोलून दाखवला. युरोपीय प्रादेशिक आयुक्त असे त्याचे संबोधन राहणार असून डॉ. चोपडे यांनी त्यासाठी विद्यापीठात जागा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आशिया खंडातील युरोपीय कमिशनचे कार्यालय येथे सुरू होऊ शकते, असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला.