आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी बोला, निर्भय व्हा, तरच जगावर राज्य कराल - माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिलांनो,इंग्रजी ज्ञानभाषा आहे. तिच्यावर प्रभुत्व मिळवून निर्भय व्हा, अन्याय सहन करू नका, भरपूर वाचन करा, विचारांना कोंडू नका, महत्त्वाकांक्षी व्हा, अशी यशाची पंचसूत्रीच बुधवार, २२ जून रोजी भारताच्या पहिल्या माजी महिला परराष्ट्र सचिव निरुपमा राव यांनी 'निरुपम संवाद' कार्यक्रमात शहरातील पाचशे महिला पोलिसांना दिली. या पंचसूत्रीचा अवलंब केला तरच तुम्ही जगावर राज्य कराल,असेही त्या म्हणाल्या.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या पत्नी अपर्णा कुमार यांनी महिला पोलिसांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आझाद कॉलेजच्या कॅम्पसमधील आयएचएम संस्थेच्या सभागृहात राव यांनी दोन तास संवाद साधला. या वेळी व्यासपीठावर पोलिस आयुक्त अमितेशकुमार, नाथ व्हॅली शाळेचे मुख्याध्यापक रणजित दास, त्यांच्या पत्नी मोनिका यांची उपस्थिती होती.पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी राव यांचे स्वागत केेले. त्याना शहर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे पॉवर पाॅईंट प्रेझेंटेशन दाखवण्यात आले. राव संवाद साधताना म्हणाल्या की,एवढ्या मोठ्या संख्येने महिला पोलिस कार्यरत असल्याचे पाहून मला आनंद झाला आहे. तुम्ही इंग्रजी बोलायला शिका, कारण ती जगाची ज्ञानभाषा आहे. भाषा अवगत केल्यास तुम्ही भारताच्या राजदूत बनाल, जगावर राज्य करू शकाल, इतकी ताकद इंग्रजीत आहे.

मराठवाड्यानेच दिले इंग्रजीचे बाळकडू : त्या म्हणाल्या की, माझ्या वडिलांची बदली १९७० मध्ये औरंगाबादेत झाली होती. त्यामुळे माझे एमए इंग्रजी येथेच झाले आहे. तेव्हा विद्यापीठातच मी उत्तम इंग्रजी बोलायला शिकले, हेच बाळकडू मला परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करताना कामी आले. मी वयाच्या बाराव्या वर्षीच इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला अन्् त्याचा पाठपुरावा केला. मला मोठे यश मिळाले; पण त्या काळी लग्न झालेल्या महिलांना फॉरेन सर्व्हिसमध्ये भरतीस बंदी होती. नोकरी करताना लग्न झाले तर करिअर सोडावे लागेल, अशी भारत सरकारची अट होती; पण काही वर्षांत ही अट शिथिल झाल्याने मी करिअरचा मोठा पल्ला गाठू शकल्याचे त्यांनी सांगितले.

४५ वर्षांनी पाहिले औरंगाबाद
राव म्हणाल्या की, सत्तरच्या दशकातले औरंगाबाद खूप वेगळे होते. आज ४५ वर्षांनी मी या शहरात आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. दिवसभरात वेळ काढून विद्यापीठ परिसर अाणि मकबरा पाहिल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सूत्रसंचालन केले, तर वाहतूक शाखेच पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी अाभार मानले.

गृहमंत्री, संरक्षणमंत्री महिला का नको?
महिला या हुशार, कणखर, उच्चशिक्षित आहेत. त्या कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत, मग आपल्या देशात त्या गृहमंत्री किंवा संरक्षणमंत्री का होऊ शकत नाहीत? खरे तर त्यांना ही संधी दिल्यास जबाबदारी त्या उत्तमरीत्या पार पाडतील, असा मला विश्वास आहे.
बातम्या आणखी आहेत...