आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Speaker Thorat Warning About Samantar Pani Yojana

काम सुधारा, नाही तर बँड वाजवणार, सभापती थोरात यांचा समांतरप्रश्नी इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने महिनाभरात आपला कारभार सुधारावा. लोकांना पाणी मिळाले नाही तर त्यांचा आम्ही बँड वाजवू, असा खणखणीत इशारा देत स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात यांनी आज पदाची सूत्रे घेतली. येणाऱ्या काळात पाणी, रस्ते आणि निधी हे तीनच विषय आपल्या अजेंड्यावर राहतील, असेही त्यांनी नमूद केले.
स्थायी समितीच्या सभापतींची आज निवडणूक झाली. त्यात भाजपचे दिलीप थोरात यांनी विजय मिळवला. पदभार स्वीकारल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजेंडा मांडला. ते म्हणाले, पाण्याचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा गंभीर विषय आहे. नागरिकांना पाणी मिळालेच पाहिजे. ते देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. यंदा मे महिना संपला तरी जायकवाडीत जिवंत पाणीसाठ्यातून शहराला पुरवठा होत आहे. याचाच अर्थ पाणी आहे, पण नियोजन नाही. त्यामुळे एकदा सगळे मिळून सविस्तर चर्चा करू. मार्ग काढण्याचे प्रयत्न निश्चित करू.
आमदार अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केला होता. शिवाय काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे. लोकांना पाणी मिळावे यासाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचीही आमची तयारी आहे, पण कंपनीने आधी आपल्या कारभारात सुधारणा करायला हवी. समांतरबाबत अशी भूमिका घेतल्यावर शिवसेनेचे काय, असे विचारले असता त्यांनी शिवसेनेचीही तीच भूमिका आहे. हा संयुक्त विषय असल्याचे ते म्हणाले.
बजेट फुगवणार नाही
मनपाच्या तिजोरीची अवस्था बिकट असून आपण लवकरच सगळी माहिती मागवून कामाला सुरुवात करणार असल्याचे थोरात म्हणाले. ते म्हणाले, विकासकामांसाठी केंद्र राज्य सरकारच्या कोणकोणत्या योजनांतून निधी आणता येईल ते पाहणे, त्या दिशेने प्रयत्न करणे हे काम करावे लागणार आहे. आता लवकरच मनपाचा अर्थसंकल्प येणार असून तो एकूण स्थिती पाहता वस्तुनिष्ठ राहील हेच पाहिले जाणार आहे.
बजेटमध्ये आकडे फुगवून कामे होत नाहीत. नुसते आकडेच वाढलेले दिसतात. प्रत्यक्षात काहीच होत नाही. त्यामुळे आवश्यकता तपासून प्राधान्यक्रमाने कामे हाती घेण्याचे आपण ठरवले आहे. या प्राधान्यक्रमात रस्त्यांचाही समावेश आहे. त्यांनी आपल्या निवडीबद्दल शिवसेना भाजपमधील सगळ्या नेत्यांनी सहकार्य केल्याचे सांगत त्यांचे आभार मानले आपण आगामी काळात समन्वयाने सर्वांना विचारूनच निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.