आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Comment : Whom Possibility To Improve Ghati

विशेष भाष्य : घाटी सुधारण्याची जबाबदारी कुणाची?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादचे घाटी म्हणजे मृत्यूच्या दाढेतून खेचून आणणारे रुग्णालय, ही ओळख पुन्हा मिळवून द्यावी आणि गोरगरीब रुग्णांना विनासायास दर्जेदार उपचार मिळावेत, या उद्देशाने ‘दिव्य मराठी’ने या रुग्णालयातील त्रुटी, व्यवस्थापनाचे दोष आणि तेथील बहुसंख्य डॉक्टरांची वाढत चाललेली अनास्था 17 भागांतून वाचकांच्या समोर मांडली. 1956 मध्ये स्थापन झालेल्या या रुग्णालयाच्या वाट्याला 1990 पासून उपेक्षाच आली. रुग्णांचे वाढते लोंढे आणि त्या तुलनेत तोकड्या यंत्रणेमुळे रुग्णांचे आणि उपचार करणार्‍या काही प्रामाणिक डॉक्टरांचेही हाल सुरू झाले. या मोजक्या डॉक्टरांनी यंत्रणा सुधारण्याचे प्रयत्न केले; पण राजकारण, हेवेदावे, व्यावसायिक स्पर्धा यामुळे त्यांची तळमळ व्यर्थ गेली. हताश झालेल्या अनेक ख्यातनाम, प्रामाणिक डॉक्टरांनी घाटीतून काढता पाय घेतला. त्यामुळे या रुग्णालयाला ग्रहणच लागले. परिस्थिती इतकी बिघडली की, इतर रुग्णालयांमध्ये उपचार घेताना मृत्यूच्या दारात उभ्या ठाकलेल्या किंवा खिसा रिकामा झालेल्या रुग्णांनाच घाटीत पाठवण्याची प्रथा रूढ झाली. तिथे दलालांचा सुळसुळाट झाला आणि प्रशासनाने त्यांना अभय दिले. या बाबी कित्येक वेळा पुराव्यासह स्पष्ट झाल्या, पण हे रुग्णालय दुबळे व्हावे या दृष्टीने प्रयत्न करणार्‍यांकडून कोणत्या कारवाईची अपेक्षा करणार?

आज खासगी किंवा इतर रुग्णालयांमधील उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काहींना मालमत्ता विकावी लागत आहे, तर काहींवर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. केवळ पैसा नाही म्हणून उपचारही नाही, ही परिस्थिती बदलायलाच हवी. गरिबीमुळे काही लोकांनी आजार सहन करत मृत्यूची वाट पाहत बसावे, हे कोणत्याही सुजाण, संवेदनशील शहराला शोभणारे नाही. सरकारने तर आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, ऊर्जा, दळणवळण अशा सर्वच क्षेत्रांमधून काढता पाय घेतला आहे, पण म्हणून ‘नाही रे’ वर्गाची ही दयनीय अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहत बसायचे? आजही शहरातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर घाटीत जाऊन मानद सेवा देण्यास तयार आहेत, परंतु तेथील वातावरण पाहूनच ते चक्रावून जातात. शहर आणि खेड्यापाड्यांतून येणार्‍या रुग्णाला तत्परतेने उपचार मिळावेत, डॉक्टरांना चांगली यंत्रणा मिळावी, रुग्णांसाठी आणलेली यंत्रे उपयोगी पडावीत आणि हे रुग्णालय सर्वार्थाने स्वच्छ व्हावे, याच भावनेतून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या मालिकेने सरकारचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. अर्थात, केवळ सरकारी मदतीवर अवलंबून राहूनही भागणार नाही. काम मोठे आहे. शहरातील लोकप्रतिनिधी, नागरिक आणि दात्यांनाही या मानवतेच्या कार्याला हातभार लावावा लागणार आहे.