आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special General Meeting About Water Held Parallel Ductus In Aurangabad

शिवसेनेची गुगली, चकला एमआयएम, भाजपचा बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तमाम औरंगाबादकरांसाठी अत्यंत महत्वाचा पण शिवसेनेसाठी अडचणीचा ठरणारा विषय सभागृहात चर्चेसाठी आला की भावनिक मुद्दा पुढे करून गोंधळ उडवत कामकाजाला कलाटणी देण्याचे कौशल्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळवले आहे. सोमवारी (१३ जुलै) समांतर जलवाहिनीविषयी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत हा प्रकार पाहण्यास मिळाला. शिवसेनेने टाकलेल्या गुगलीपुढे एमआयएम नगरसेवक फसले आणि त्यात चर्चेसाठी साडेपाच तास ठाण मांडून बसलेल्या भाजपचा बळी गेला. सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी संभाजीनगर असा उल्लेख करताच एमआयएमचे नगरसेवक उसळले. त्यांनी महापौरांच्या आसनासमोर गर्दी केली. त्याचा फायदा घेत महापौरांनी घरांमध्ये मीटरची सक्ती नसल्याचे जाहीर करून सभा संपवली.

गेल्या २५ वर्षापासून सत्तेत असलेली शिवसेना नेहमीच भावनिक मुद्दा पुढे करून महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देते. त्यात भाजपचे नगरसेवकही हिरीरीने सहभागी होतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. आज भाजपला धोबीपछाड देण्यासाठी शिवसेनेने हेच हत्यार वापरले. समांतरवरून अातापर्यंत बचावात्मकच राहिलेल्या शिवसेनेने फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये भाजपवर बाजी मारली. साडेदहा वाजता सभा सुरू झाल्यापासून भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे समांतरच्या मीटरची खोकी फिटिंगचे नमुने टेबलावर मांडून बसले होते.

समांतरच्या ठेकेदाराचा कारभार आणि मीटरमधील गैरप्रकार सभागृहापुढे मांडण्यासाठी भाजपचे नगरसेवक सकाळी दहा वाजेपासून सभागृहात आले होते. त्यांनी साेबत मीटर आणि त्यासोबतचे साहित्यही आणले होते.

मग घोषणाबाजी
चारवाजेनंतर हा विषय निघाला तेव्हा सभागृहातील सदस्यांची ऊर्जा उत्साहही संपत आला होता. कसेबसे विषयाला तोंड फोडत भाजपच्या घडामोडे, दिलीप थोरात, राजू शिंदे, प्रमोद राठोड यांनी थोडक्यात बाजू मांडली. हे प्रकरण एमआयएमच्या साथीने तापत असतानाच सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा ठासून उल्लेख केला आणि औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर असे वातावरण झाले. पार ‘जय भवानी जय शिवाजी’ ते ‘नारा तदबीर’पर्यंत घोषणा देत दोन्ही बाजूंचे सदस्य महापौरांच्या आसनासमोर गोळा झाले. या गोंधळातच विषयाचे गांभीर्य संपले महापौरांनी रुलिंग देत सभाही संपवून टाकली.

आधी महिलांना संधी...
पणमहापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ गटनेते राजू वैद्य तसेच नंदकुमार घोडेले यांनी टाइट फील्डिंग लावत आधी पाणीपुरवठ्याच्या कोलमडलेल्या वेळापत्रकावर महिलांना बोलण्याची संधी द्या. त्यानंतर मीटर पाणीपट्टी वसुली या विषयावर बोलू असे घोषित केले. तिथेच भाजपची पहिली विकेट गेली. एकापाठोपाठ एक नगरसेवक पाणीपुरवठा कसा विस्कळीत झाला आहे आपापल्या वॉर्डांची काय अवस्था आहे यावर बोलत राहिले. मध्येच कुणी मीटर वसुलीचा विषय काढला तर तो नंतर बोला, असे सांगून बसवले गेले. साडेदहा ते चार वाजेपर्यंत मीटरचा विषयच आला नाही.