आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special IG Vishwas Nangare Patil Guidance To Student For Success

सत्यासाठी संघर्ष हेच जीवन, विश्वास नांगरे पाटीलांनी दिल्या यशस्वी होण्याच्या टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सत्यासाठी संघर्ष करणे हेच युवकांचे आद्य कर्तव्य आहे. स्वत:च्या नजरेतून कधीच उतरणार नाही अशा पद्धतीने आयुष्यभर वर्तणूक ठेवा, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसंतराव नाईक अध्यासन केंद्रातर्फे आयोजित दोनदिवसीय स्पर्धा परीक्षा संमेलनाचे उद््घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रा. मोतीराज राठोड, केंद्राचे संचालक डॉ. अशोक पवार, युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त युनिक अकॅडमीच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांशी दोन हात करणारे नांगरे-पाटील यांना ऐकण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली होती. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत राज्य, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या मराठी तरुणांची संख्या बरीच वाढली आहे. स्वत:चे तंत्र विकसित करून अशक्याला शक्य करण्याची कला तरुण अवगत करू लागला आहे.
माहिती तंत्रज्ञान युगातील तरुणाकडे अद्ययावत ज्ञान आहे. याच्या जोडीला सामाजिक वास्तवाचे भान असायला हवे. आयुष्य ही एक लढाई असते. छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्यासमोर असून त्यांच्या गनिमी कावा या युद्धतंत्राचा अवलंब वेळप्रसंगी आपण केला पाहिजे, असेही नांगरे पाटील म्हणाले. सन २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे वर्णन त्यांनी केले. तेव्हा सभागृहातील वातावरण रोमांचित झाले होते. कुसुमाग्रजांच्या "स्वातंत्र्यदेवतेची विनवणी' या कवितेने आपल्या भाषणाचा त्यांनी समारोप केला.
माणसाच्या संवेदना बोथट : आजकाल हायटेक पिढी जन्माला आली आहे. टीव्ही, मोबाइल इंटरनेट या माध्यमांचा प्रभाव पडला आहे. टच स्क्रीनच्या वापरामुळे निर्जीव वस्तू संवेदनशील, तर सजीव माणसांच्या संवेदना बोथट असे विदारक समाज वास्तव आपल्यासमोर आहे, असे इदाते म्हणाले. यातून मार्ग काढण्यासाठी चारित्र्यवान, िनर्व्यसनी कर्तबगार पिढी घडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक यांनी पंचायतराज माध्यमातून सामान्य माणसांच्या हाती सत्तेची सूत्रे दिली, असे डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले. प्रास्ताविक डॉ. अशोक पवार यांनी केले. डॉ. सरदारसिंग बैनाडे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास अ. भा. शैक्षणिक महासंघाचे बाळासाहेब सराटे, प्रा. भीमराव भोसले, डॉ. पंढरीनाथ रोडगे, प्रा. रमेश पांडव आदींची उपस्थिती होती.
आज मान्यवरांची व्याख्याने
संमेलनात गुरुवारी प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, हर्षल लवंगारे, मनोहर भोळे, इस्रोचे शास्त्रज्ञ महेशकुमार बोडा, प्राचार्य मधुकर पवार, डॉ. यशवंत खिल्लारे, डॉ. वि. ल. धारूरकर, डॉ. सय्यद अझरोद्दीन, कपिल हाडे पाटील, नागेश गव्हाणे हे मार्गदर्शन करणार आहेत.