आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Interview Of Sarangi Mahajan In Divya Marathi

विशेष मुलाखत: सारंगी महाजन राजकारणात सक्रिय होण्यास उत्सुक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘लहानपणापासून संघाच्या विचारधारेत वाढले. नागपुरात विद्यार्थी परिषदेचे भरपूर कामही केले. आता सक्रिय राजकारणात प्रवेश करायचा आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विचारणा झाली होती. पण माझी वेव्हलेंथ भाजपशी जुळलेली असल्याने त्या ऑफर नाकारल्या. आता २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून संधी मिळण्याची वाट आहे,’ अशी भावना सारंगी महाजन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीणच्या सारंगी या पत्नी आहेत. प्रमोद यांचा खून केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असताना प्रवीणचा ब्रेन हॅम्ब्रेजने मृत्यू झाला होता. प्रमोद यांच्या खुनानंतर महाजन कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला आहे. मात्र झाले गेले विसरून कुटुंबीय एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले असल्याचेही सारंगी यांनी सांगितले. सारंगी यांची मुलगी सुमती हिचा २ मे रोजी निगडी (पुणे) येथील केटरिंग व्यावसायिक केऊर आचार्य यांच्याशी विवाह होत आहे. या सोहळ्याच्या पत्रिका वाटपासाठी त्या औरंगाबादेत आल्या होत्या. यानिमित्ताने ‘दिव्य मराठी’कडे पहिल्यांदाच त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीर केली.

संवादच संपला होता...
‘त्या घटनेनंतर वरळीतील प्रमोद महाजनांच्या घरात मी कधीही गेलेले नाही. त्यामुळे पूनम महाजन यांना प्रत्यक्ष पत्रिका देणे शक्य होणार नाही. तिला फोन करतेय, पण तो दुस-यालाच लागतोय. यामुळे राहुल आणि तिला कुरियरने पत्रिका पाठवणार आहे. गेली ९ वर्षे आमच्यात काहीच संवाद नाही. घरात सण साजरे होत नसल्यामुळे दिवाळी, नवे वर्ष याचे मेसेज येत नाहीत. माझा मुलगा कपिल, मुलगी सुमती आणि इतर महाजनांचे मार्ग वेगळे असल्याने त्यांच्यातही कधीच संवाद होत नाही; पण आता जे झाले ते विसरून सर्वांनी लग्नाला यावे’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एकोप्यासाठी पुढाकार
‘प्रमोद महाजनांच्या हत्येनंतर कुटुंबात वितुष्ट आले. ते दूर व्हावे अशी सुरुवातीपासूनच अपेक्षा होती; पण तेव्हाच प्रयत्न केले असते तर मी पैशांसाठी पुढे पुढे करत असल्याचे लोकांना वाटले असते. पण आता मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच मी सर्वकाही विसरून पहिली पत्रिका प्रकाश काकांना (महाजन) दिली. दोन दिवसांपूर्वी मोठ्या नणंद प्रतिभा भातांब्रेकर यांनाही निमंत्रण दिले. पंडितअण्णा मुंडे यांनाही पत्रिका देऊन आग्रहाने बोलावले. प्रकृतीच्या कारणाने धनंजयला पाठवणार असल्याचे त्यांनी सांिगतले,’ असे सारंगी यांनी सांगितले.

भाजपकडून प्रतीक्षा : सारंगी म्हणाल्या, ‘मला राजकारणात इंटरेस्ट आहे. कोणतेही पद नसताना मी ठाण्यात काम करतच आहे. पण अद्याप संधी मिळालेली नाही. गडकरी, फडणवीस यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. २०१९ पर्यंत मी ठाण्यात एवढे काम करणार आहे की पक्ष स्वत:हून मला बोलावून घेईल.’

खटला सोडवणार : उस्मानाबादच्या जमिनीचे प्रकरण २०११ पासून सुरू आहे. वहिनी (प्रमोद यांच्या पत्नी) आणि पूनम हजर न राहिल्याने विलंब होतोय. आम्ही सामंजस्याने हे प्रकरण कोर्टाच्या बाहेर सोडवणार आहोत. प्रकाश यांनी यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच ते मार्गी लागेल, अशी माहितीही सारंगी यांनी दिली.