आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Interview Of Singer Udit Narayan In Divya Marathi

विशेष मुलाखत: शेतकरी पुत्राचा हा मोठा सन्मान - उदित नारायण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बिहारमध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान होणे, ही आयुष्यातील सर्वांत मौल्यवान गोष्टींपैकी एक आहे, अशी भावना प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. या निमित्ताने ‘दिव्य मराठी’शी त्यांनी केलेली बातचित ...

>नेपाळमधून सुरू झालेला प्रवास या सन्मानापर्यंत पोहोचला आहे?
उदित- मला आज हा प्रवास स्वप्नवत वाटतो. माझे शालेय शिक्षण नेपाळमध्ये झाले. नंतर रेडिओ नेपाळमध्ये तब्बल ८ वर्षे काम केले. केवळ १५० रुपयांची नोकरी अन्् राजधानीच्या शहरात वास्तव्य. अशा परिस्थितीत जगलो. दिवसा रेडिओतील नोकरी आणि रात्री हॉटेलमध्ये जाऊन गायचो. त्या सर्व कष्टाचं आज चीज झाल्यासारखं वाटतं.
>पहिल्यांदा कशी संधी मिळाली?
उदित - ८० च्या दशकात भारताच्या उच्चायुक्तांकडून मला भारतीय विद्या मंदिरात २०० रुपये स्टायपंडवर शास्त्रीय संगीत शिकण्याची संधी मिळाली. १९८० मध्ये संगीतकार राजेश रोशन यांनी त्यांच्या ‘उन्नीस बीस’ या चित्रपटात मोहम्मद रफी यांच्यासोबत गायनाची संधी दिली. मी मोहम्मद रफी साहेबांना आदर्श मानतो अन् त्यांच्यासोबतच पहिले गाणे गायचे होते. कदाचित त्यांच्याच आशिर्वादाने इथवर पोहोचलो.
>सध्याची दिनचर्या काय?
उदित - आता पूर्वीसारखा रियाज करत नाही. मात्र, अजूनही महिन्यातून १५-१६ गाणी रेकॉर्ड करतो. गायन हेच माझे जीवन आहे. त्याचा ध्यासच घेऊन मी जगतो आहे.

महाराष्ट्रासाठी योगदान द्यायचेय
मी मूळ शेतकरी कुटुंबातला. महाराष्ट्रात माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. येथील दुष्काळी स्थिती पाहून दु:ख वाटते. त्यावरील उपाययोजनेसाठी मला माझा वाटा द्यायचा आहे, अशी भावनाही उदित यांनी व्यक्त केली आहे.