आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Interview Of Uddhav Thackeray In Divya Marathi

खास मुलाखत: भाजप खासदारांचे राजीनामे घेऊन पुन्हा निवडणुका घ्या, उद्धव यांचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभेत आम्ही एनडीए म्हणून लढलो. महाराष्ट्रात भाजपच्या उमेदवारांना खासदार करण्यासाठी शिवसैनिकांनीही घाम गाळला. त्यांच्या विजयात शिवसेनेच्या मतदारांचीही मते आहेत. आता केंद्रातून शिवसेनेने बाहेर पडायचे असेल तर आमच्यासोबत भाजपच्या खासदारांनी राजीनामे द्यावेत आणि पुन्हा निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. एकीकडे मोदी महाराष्ट्राला देवेंद्र फडवणीसच्या रूपात नवा नेता दिल्याचे म्हणतात. दुसरीकडे हाच नेता महाराष्ट्राचे तुकडे करण्यास निघाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. निवडणुकीनंतर गरज पडल्यास सरकार बनविण्यासाठी भाजपला बरोबर घेतले जाऊ शकते का, या थेट प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी.-
प्रश्न : सध्या शिवसेना, मनसे एका सुरात भाजपवर हल्ला करत आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष असे स्वरूप आले आहे असे वाटत नाही का?
- मुळीच नाही. अशी लढाई नाही. आम्ही देश सांभाळायला मोदींच्या ताब्यात दिला आहे. पण मोदींनी अख्खे मंत्रिमंडळच प्रचारात उतरवले. तिकडे सीमेवर पाकचा गोळीबार सुरू आहे. त्याला उत्तर कोण देणार? तेच म्हणाले होता ना, त्यांनी पाच मारले तर आम्ही ५० मारू. मग काय झाले त्याचे? आता युद्ध करा ना पाकिस्तानशी. देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी भाजपचा प्रचार कसा करू शकतात? तोही पक्षाचं चिन्ह अंगावर मिरवून. हा दडपण आणण्याचाच प्रकार आहे.
प्रश्न : या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा राजकीय नकाशा बदलेल, असं वाटतं?
- राजकीयच नाही, जर भाजपचं सरकार आलं तर महाराष्ट्राचा भौगोलिक नकाशाच बदलेल. आणि पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं तर महाराष्ट्राचा नकाशाच पुसला जाईल.
प्रश्न : युती तुटल्याचं खरं कारण नेमकं काय सांगाल तुम्ही?
- पूर्वी जेव्हा युतीची बोलणी व्हायची तेव्हा भाजपकडून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांसारखे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाण असणारे लोक होते. ते आमच्याशी बोलणी करत आणि अडवाणी, वाजपेयींना प्रचारासाठी येण्याचे निमंत्रण देत. या वेळी उलटे झाले. जागा वाटपाच्या प्रत्येक बैठकीत दिल्ली का ऐसा बोलना, दिल्ली से यह कहना है, असे सांगितले जाऊ लागले. जागा वाटप म्हणजे काय बुद्धिबळाचा डाव आहे का? हा अहंकाराचा प्रश्न नाही. पण आम्ही तुम्हाला सत्ता मिळवून द्यायची आणि नंतर आम्हीच तुमच्या पालखीचे भोई राहायचे का. तुम्हाला अर्ध्या जागा देऊन आम्ही काय करायचे? हा आमचा प्रश्न होता.
प्रश्न : मोदी लाटेमुळे त्यांना जास्त जागा हव्या असे भाजपकडून सांगितले जात होते. ती लाट तुम्हाला मान्य नव्हती का?
- लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींची लाट होती असे एक वेळ मान्य करू. मग लाट होती तर अशोक चव्हाण, उदयसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील, सुप्रिया सुळे हे उमेदवार कसे निवडून आले, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. लाट असती तर हे सहा खासदारही निवडून यायला नको होते.
प्रश्न : तुम्ही व राज निवडणुकीनंतर नक्की एकत्र येणार, असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. नानांचं विधान खरं होईल?
- निवडणुकीनंतर काय होईल हे मी आत्ताच कसे सांगणार? मी काही ज्योतिषी नाही. सभेला बोलायला उभा असतो तर ऊन असते. थोड्यावेळात पाऊस पडतो.
प्रश्न : म्हणजे असं होणारच नाही, असंही तुम्ही ठामपणे सांगत नाही आहात.
- आता हा प्रश्न संयुक्तिकच नाही ना. असेही म्हटले जाते की, राष्ट्रवादी भाजपची युती होणार आहे. कारण राष्ट्रवादीच्याच अनेकांना भाजपने उमेदवारी दिली आहे. काय सांगता येते उद्या ते एमआयएम, काँग्रेससोबतही जातील. मला शिवसेना स्वबळावर सत्तेत येईल, याची खात्री वाटते आहे.
प्रश्न : पण परिस्थिती उद्भवलीच तर लोकांची इच्छा म्हणून तरी तुम्ही भाजपसाठी दारे उघडी ठेवणार आहात की नाही?
- आता दार उघडे का, खिडक्या उघड्या आहेत का, असे सांगता येणार नाही आणि दारं उघडी ठेवायचा विषय येतो कुठे? युती त्यांनी तोडली आहे. आम्ही नाही. त्यांनी हात सोडला असेल तर तो पुन्हा धरण्याचा प्रश्न आमचा कसा असेल?
प्रश्न : समजा भाजपने निवडणुकीनंतर हात पुढे केला तर तुम्ही स्वीकारणार का?
- त्यांनी हात पुढे केला तरी महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छीणा-यांना आम्ही कसे बरोबर घेणार? भाजपला विदर्भ वेगळा करायचा असेल तर ते आम्हाला चालणार नाही. विदर्भ तोडण्यापेक्षा पाक व्याप्त काश्मीर जोडा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिले हिंदुत्वाचे नाते का तोडले, याचे उत्तर भाजपला द्यावे लागणार आहे.
प्रश्न : मोदी विकासाचं स्वप्न बेगडी आहे, असं म्हणाल का?
- तसं मी म्हणणार नाही. पण मी जे सांगतो आहे त्याची योजना माझ्याकडे तयार आहे. माझ्या सोबत जो टॅब आहे त्यात पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम तयार आहे. व्हर्च्युअल क्लासरूमची योजना तयार आहे. शिवप्रकाश नावाच्या विजेशिवाय चालणा-या बल्बची योजना आहे. बैलाच्या यंत्रापासून शेतातली मोटर चालेल अशी संकल्पना तयार आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ते हवे आहे की नको हे त्यांनी ठरवायचे आहे. मोदींना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे तर त्यांनी द्यावी मुंबई ते नागपूर मेट्रो. आम्ही त्यांचं निश्चितच स्वागत करू.
प्रश्न : भाजपलाच लक्ष्य केल्याने
कॉंग्रेस-राष्ट्रवादी या प्रमुख विरोधकांकडे दुर्लक्ष होते आहे का?
- मी तर लोकसभेतच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची लक्तरे बाहेर काढली होती. लोकांनी तर हे सारं प्रत्यक्ष भोगलं आहे. त्यामुळे आता खरं तर त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायचीही गरज राहिलेली नव्हती. लोकांनी ठरवलं होतं युतीकडे सत्ता सोपवायचीच असं. पण मध्येच युती तुटली. त्याचा लोकांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना जाणून घ्यायचं आहे युती का तुटली ते. म्हणून ते सभांमधून सांगावं लागतं आहे.
प्रश्न : शिवसेनेच्या सरकारमध्ये आदित्यची भूिमका काय असेल?
- या प्रश्नाचा अर्थ शिवसेनेचे सरकार येणार हे तुम्ही मान्य करता आहात. आदित्यची मला या कामात खूप मदत होते आहे. त्याच्याशी युवक जोडलेला आहे. त्याच्या माध्यमातून युवकांच्या अपेक्षा, गरजा आम्हाला कळत राहातील. त्यामुळे आदित्यची भूमिका महत्त्वाचीच असेल हे नक्की.
प्रश्न : आदित्य सरकार -युवकांतील दुवा असेल की सरकारमध्ये असेल?
- निवडणूक लढविण्याइतके अजून त्याचे वय नाही. त्यामुळे तो दुवा नक्कीच असेल.

प्रसन्न चित्त उद्धव ठाकरे..
* औरंगाबाद शहरातील हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीसाठी वेळ दिली होती. त्यावेळी ते प्रसन्न चित्त होते. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याशी ते गप्पा मारत होते.
* हातात पांढ-या रंगाचा मोबाइल आणि समोरच्या टी-पॉयवर टॅब होता. मोबाइलला आवर्जून भगव्या रंगाचे कव्हर लावलेले लगेच जाणवत होते.
* योजना तयार आहे हे सांगताना ‘टॅब’मधील डिजिटल अभ्यासक्रमच त्यांनी प्रत्यक्ष दाखवला.
* शिवप्रकाश दिव्याची योजना सांगताना तो दिवाही त्यांनी लावून दाखवला. तो कसा कमरेला टांगूनही चालता येईल, हेही दाखवले.
* गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भातल्या आठवणी सांगताना त्यांच्याशी असलेल्या जवळीकीतून एकमेकांशी आपण कशा शब्दात बोलत असू हेही त्यांनी मोकळेपणे, अर्थात न छापण्याचे आवाहन करीत सांगितले. त्याला जोडून बाळासाहेबांची आठवण सांगितली.
* ज्या मोबाइलमध्ये मुलाखत रेकॉर्ड होत होती त्या मोबाइलकडे चहा ठेवणा-याचे लक्ष नाही असे वाटून ते क्षणभर दचकले आणि स्वत:च तो मोबाइल सुरक्षित ठिकाणी सरकवला.