आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Squade Raid On Jaikwadi's Illeagal Rrigation

जायकवाडीवरील अवैध उपसा करणा-यांवर विशेष पथकाची धडक कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण/औरंगाबाद - जायकवाडीचे पाणी सिंचनासाठी वापरू नये, असा मुख्यमंत्र्यांचा आदेश धुडकावत धरणातून 4 हजार शेतीपंपाद्वारे रोज 11 कोटी 52 लाख लिटर पाण्याचा अवैध उपसा होत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी प्रकाशित केले. त्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली असून विशेष पथकाने धडक कारवाईस सुरुवात केली. दिवसभरात 250 मोटारींचे कनेक्शन बंद केले.

तहसीलदार राजीव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. शेतक-यांनी पथकाला घेराव घालत कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पथकाने उजव्या कालव्याची पाहणी केली. तेथे दीडशेपक्षा जास्त मोटारी अवैध उपसा करत असल्याचे आढळले. या मोटारींचे कनेक्शन बंद करण्यात आले. याकडे कानाडोळा करणारे वायरमन जी. एम. राजूरकर यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांनी महावितरणच्या अधिका-यांना दिल्या. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता जगदीश सरदेशपांडे यांनी डाव्या कालव्यावर मोटारींवर कारवाई केली. या वेळी महावितरणचा केवळ एक वायरमन हजर होता. डाव्या कालव्याचे निरीक्षक बी. व्ही. पवार यांची बदली करण्यात यावी, अशा सूचनाही पाटबंधारे अधिका-यांना करण्यात आली.

पथकातील पोलिस गायब
प्रशासनाने नेमून दिलेल्या पथकात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पोलिस, पाटबंधारे विभाग, मंडळ अधिकारी आणि महावितरण अधिका-यांचा समावेश आहे. कारवाईच्या काळात स्थानिक शेतक-यांनी कारवाईला विरोध करत तहसीलदारांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पथकातील पोलिस अधिकारी मात्र गायब असल्याचे दिसून आले.


जनावरांसाठी तरी पाणी द्या : शेतकरी
जनावरांच्या छावण्या अजून उभारलेल्या नाहीत. त्यामुळे जनावरांचा प्रश्न आहे. किमान जनावरांसाठी तरी पाणी द्या, अशी मागणी शेतक-यांनी केली. उद्योगासाठीच्या पाणीपुरवठ्यात कपात करावी, अशी मागणी त्यांनी केली. काही शेतक-यांनी पथकाला आत्मदहनाचा इशाराही दिला. या वेळी आबा मोरे, शिवाजी मोरे, प्रकाश लबडे, भाऊराव थोरात, संजू जाधव, नाना रंधे, शिवाजी रोडे, अंकुश बोबडे आदी शेतकरी उपस्थित होते.


मोटारी, इंजिन जप्त करणार
सिंचनासाठी पाणीवापरावर बंदी आहे. उर्वरित मोटारी काढण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. तसे झाले नाही तर या मोटारी आणि इंजिन जप्त करण्यात येतील.’’
राजीव शिंदे, तहसीलदार