आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदेश रमजानचे : सर्वधर्मसमभाव महत्त्वाचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा जन्म केवळ हिंदूधर्मात नव्हे तर अगदी ‘चित्तपावन ब्राम्‍हण’ कुटुंबात झाला. असे असले तरी मला मुस्लिम स्नेही भरपूर आहेत. शेजारी, गुरू, गुरुबंधू, जिवलग मैत्रिणी असा माझा अनेक मुस्लिम बांधवांशी परिचय. दरवर्षी ईदला मोठय़ा आत्मीयतेने बोलावणारे, न गेल्यास राग न धरता घरपोच डबे पोहोचवणारे माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. त्या सर्व ज्ञात-अज्ञात बांधवांच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्यासाठी हा लेख लिहावासा वाटतोय.

मुस्लिम कुटुंबाशी लहानपणीच माझा परिचय झाला. वडील व्ही. व्ही. भावे हे महसूल खात्यात मामलेदार होते. तेव्हा त्यांचे अनेक सहकारी मुस्लिम होते. पुढे मला शाळेत भेटलेले मुस्लिम मित्रमैत्रिणी घरी ईदीला बोलवायचेच. आमच्यासाठी खास शाकाहारी पदार्थ तयार केले जायचे. गेल्या 25 वर्षांपासून जिवलग मैत्रीण असलेल्या मलिकाकडे शिरकुर्मा खायची सवय झाली. आजही तोच क्रम चालू आहे. तिच्याशी बोलताना मला इस्लामची तत्त्वे कळाली. शांतीचा संदेश कळाला.

सध्या फक्त इतकंच कळलंय की इस्लाम हा प्राचीन धर्म आहे. हजरत महंमद पैगंबर (स.) यांनी या धर्माचा जगभर प्रसार केला. अत्यंत साधी, आचरण्यास सोपी तत्त्वे त्यांनी अनुयायांना सांगितली. म्हणून तर वाळवंटी प्रदेशापासून जगाच्या पाठीवर कुठेही इस्लामी अनुयायी त्याच निष्ठेने कुराण पठण करणारच. निष्ठेने पाच वेळा नमाज पढणार. नमाज केल्याने चित्तशुद्धी होते. मन शांत, पवित्र होते. संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो, शरीर तंदुरुस्त राहते. प्रार्थनेच्या स्थळी सर्वसामान्य माणूस, गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव न होता सर्वजण एकत्र नमाज पढतात. साधा पांढराशुभ्र वेश, उपवास करणे हे गरिबांना समजून घेण्याचा प्रयत्न आहे. गोरगरिबांना दानधर्म(खैरात) करणे, हे या पवित्र महिन्यात महत्त्वाचे कार्य मानले जाते. एकूण आपण आपल्या सुखासाठी नसून समाजाचे देणे लागतो, ही सामाजिक बांधीलकी इस्लामने अनुयायांना दिली आहे. हजारो वर्षांपूर्वीचा ग्रंथ आजही श्रद्धेने वाचणे, त्यावर दृढ विश्वास ठेवणे यातच इस्लामचे आणि महंमद पैगंबर (स.) यांचे यश सामावले आहे. इस्लामची शांतीची तत्त्वे, प्रेमाचा संदेश आपल्या धर्माच्या जवळचे वाटतात. साने गुरुजींना इस्लामच्या शांती संदेशाबद्दल फार आदर, आत्मीयता वाटली होती. त्यावर त्यांनी उत्कृष्ट पुस्तकही लिहिलेले माझ्या वाचनात आले आहे. आम्ही हिंदू-मुस्लिम आपापल्या धर्मातल्या चांगल्या तत्त्वांबद्दल तासन्तास बोलतो. आमची बौद्धिक चर्चा खूप रंगतेही. याला मुख्य कारण प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल फक्त सांगावंस वाटते. दुसर्‍या धर्माबद्दल आदराने ऐकायचेही असते. आमची नाती वर्षानुवर्षे घट्ट टिकून आहेत. त्यात भिन्न धर्मामुळे काहीही व्यत्यय येत नाही. हा आनंद वेगळाच.

आजही या मुस्लिम बंधूंचं कुटुंब, मैत्रिणीचे कुटुंब, शेकडो मुस्लिम विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांत सहज मिसळू शकते. या मागे काय असावं? तर ईदसारखा सर्वांना जोडणारा सणच. आपल्या मृत्यूपूर्वी पत्नीला ‘कुणी गरजू आहे का बघ, घरात काय असेल ते त्याला देऊन टाक, मग मी सुखाने प्राण सोडीन!’ असे म्हणणारे महंमद पैगंबर (स.) मला महामानवच वाटतात. म्हणून इस्लामविषयी, त्यांच्या तत्त्वे या धकाधकीच्या जीवनात तंतोतंत पाळणार्‍यांविषयी मला अतीव आदरच आहे. एकमेकांच्या धर्मातील चांगल्या बाबी आत्मसात केल्यास देशात सर्वधर्मसमभाव वाढीस लागेल. आपापला धर्म सांभाळून परधर्मीयाबद्दल मानसम्मान, आदर बाळगता येईल. इस्लाम धर्मामधील बंधुभाव आणि दीनदुबळ्याविषयी सांगीतलेला दयाभाव नक्की अनुकरणीय आहे. याठिकाणी सुरेश भटांनी लिहिलेली गझल अत्यंत सर्मपक वाटते.

अखेरचा आसरा महंमद
उजाड वैराण वाळवंटी
खळाळणारा झरा महंमद
जगातल्या दीन-दु:खितांचा
अखेरचा आसरा महंमद


संकलन : नौशाद उस्मान