आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्म 360 डिग्री: औरंगाबादेतील संशोधनामुळे 40 देशांत वंध्यत्व उपचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘स्पर्म 360 डिग्री’ या भन्नाट संकल्पनेला मूर्तरूप देणारे डॉ. प्रमोद बजाज यांनी औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वंध्यत्व निवारणात उपयुक्त ठरलेल्या ‘स्पर्म मीटर’ आणि ‘डीएनए फ्रॅग्मेन्टेशन’ उपकरणांचा शोध त्यांनी लावला आहे. त्यांचा पुरवठा ते जगातील 40 देशांना करीत आहेत. या दोन्ही उपकरणांचा शोध लावणारे डॉ. बजाज हे देशातील पहिले आणि जगातील दुसरे संशोधक ठरले आहेत.

आयसीएमआरनेही त्यांना पुरुष वंध्यत्वावर अभ्यासक्रम तयार करण्याचा सल्ला दहा दिवसांपूर्वीच दिला आहे. याचा फायदा देशातील 20 टक्के वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना होणार आहे. विकसित देशांमध्ये वंध्यत्वावरील उपचार प्रजोत्पादन आरोग्य सेवेचा अविभाज्य भाग मानला जातो. त्यामुळे वंध्यत्वाशी संबंधित तंत्रज्ञान आणि संशोधित उपकरणांना राजमान्यता मिळते. याचा फायदा त्या त्या देशातील नागरिकांना तत्काळ होतो. मात्र, भारतात वंध्यत्वावरील उपचार हा सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात अंतर्भूत नाही. डॉ. बजाज यांनी स्वयंप्रेरणेने विकसित केलेली उपकरणे देशपातळीवर सार्वजनिक कार्यक्रमात महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात.

मात्र राज्य-केंद्राचे आरोग्य खाते अंधारात चाचपडत आहेत. परिणामी ही उपकरणे देश-विदेशातील केवळ खासगी प्रयोगशाळा आणि हॉस्पिटलांत वापरली जात आहेत. डॉ. बजाज यांच्या स्पर्म बँकेतील सीमेन सॅम्पलपासून गर्भधारणेचे प्रमाण सर्वाधिक असल्याने देशभरातील डॉक्टर व दाम्पत्य त्यांच्या लॅबमधील सीमेनलाच प्राधान्य देत आहेत.

या देशांना पुरवठा : जर्मनी, इटली, आखाती देश, मध्य पूर्व, दक्षिण आशिया, आफ्रिका व कॅरेबियन देश. उपकरणे युरोपीय देशांच्या दर्जाची असून ती सर्टिफिकेट ऑफ कन्फमिटी प्रमाणित आहेत.

पहिली ह्यूमन डोनर सिमेन बँक
डॉ. बजाज मूळचे जालन्याचे. औरंगाबादेत त्यांनी एमबीबीएस व सूक्ष्मजीवशास्त्रात एमडी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिव्याख्यातापदी तीन वर्षे नोकरी केल्यानंतर 1992 मध्ये त्यांनी दिल्लीत अनिवासी भारतीय डॉ. भाषिणी रावसोबत देशातील पहिली ‘ह्यूमन डोनर सिमेन बँक’ सुरू केली. डॉ. राव अमेरिकेत गेल्याने ही बँक बंद पडली. नंतर डॉ. बजाज यांनी औरंगाबादेत स्वत:च्या मालकीचे भारतातील पहिले ‘स्पर्म प्रोसेसर - लॅबोरेटरी अँड्रॉलॉजी युनिट’ सुरू केले. नंतर या युनिटचे स्पर्म प्रोसेसर प्रा. लि. नावाच्या कंपनीत रूपांतर केले.