आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्रीतील ड्रेनेजलाइन डॅमला गळती; दूषित पाणी नदीपात्रात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- संपूर्ण फुलंब्री शहरातील बाजारपट्टी परिसरातील ड्रेनेजलाइनचा डॅम लीक होऊन अनेक महिने उलटले असून अद्याप नगर पंचायत कार्यालयाच्या वतीने दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बाजारपट्टी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  फुलंब्री नगर पंचायतीने तत्काळ ड्रेनेजलाइनच्या डॅमची दुरुस्ती करून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  

फुलंब्री शहरातील बाजारपट्टीलगतच्या हजरत बहाउद्दीन दर्ग्याजवळील नदीच्या कडेला गावातील मुख्य ड्रेनेजलाइनचा डॅम बांधण्यात आला आहे. हा डॅम दि. १७ व १८ सप्टेंबर २०१५ रोजी झालेल्या पावसामुळे ड्रेनेजलाइनचा पाइप फुटल्यामुळे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी नदीपात्रातून थेट फुलंब्री येथील मध्यम प्रकल्पात मिसळत होते. त्या वेळी त्याची दुरुस्ती करण्यात आली.

परंतु फुलमस्ता नदीला पाणी असल्यामुळे ड्रेनेजलाइनचा डॅम लीक असल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही. मात्र नंतर डॅमच्या बाजूचे पाणी ओसरल्याने डॅम उघडा होऊन तो लीक असल्याचे निष्पन्न होऊन आजघडीला वर्ष उलटले आहे. मात्र, डॅमची दुरुस्ती नगर पंचायत कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेली नाही. तसेच आधी हे पाणी नदीतून थेट धरणात जात होते. त्यामुळे धरणावरील पाण्यालाही या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यामुळे धोका निर्माण झाला होता. 

हा धोका लक्षात घेऊन नगर पंचायतीने फक्त धरणाकडे जाणाऱ्या पाण्याला नदीपात्रातील वाळूने बांध करून अडवले. मात्र आता हे पाणी नदीपात्रातून मागे वळत असल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष आहे. पाण्यामुळे नागरिकांना डेंग्यू, कॉलरा, गॅस्ट्रो, डायरिया, चिकुनगुन्या, कावीळ यासारख्या आजारांना बळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी 
ड्रेनेजलाइन डॅमला गळती लागली असून पुर्वी नदी वाहती होती तेव्हा हे पाणी नदीत मिसळून थेट मध्यम प्रकल्पात जात असल्याचे दिसून आले होते. परंतू दुरुस्तीनंतर आता पुन्हा नदीचे पाणी कमी झाल्याने पात्रात गळती होत असल्याचे दिसत असून ही गळती आता नदीच्या पाण्यात मिसळत चालल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. 

नगर पंचायतीने लक्ष द्यावे   
ड्रेनेजलाइनचा डॅम लिकेज होऊन दुर्गंधीयुक्त पाणी समोर अडवण्यात आल्याने हे पाणी परत नदीपात्रात येत आहे. त्यामुळे नदीपात्राच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  
- वाल्मीक जाधव, तालुकाध्यक्ष, कैकाडी समाज संघटना

दूषित पाणी आरोग्यास घातक  
ड्रेनेजलाइनचा डॅम लीक होऊन जे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी वाहतेय ते आरोग्यास घातक आहे.  पाण्यामुळे डेंग्यू, कॉलरा, गॅस्ट्रो, डायरिया, चिकुनगुन्या, कावीळ असे आजार होऊ शकतात. 
- विलास विखे, तालुका आरोग्य अधिकारी
बातम्या आणखी आहेत...