आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Spion TB' Vertebra With Increased Disease In 20 Th Year

विशीतच ‘स्पायनल टीबी’सह मणक्यांचे विकार वाढले

8 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

औरंगाबाद- पन्नाशी-साठीत होणारे मणक्यांचे विकार आता विशीतच दिसत आहेत. ‘स्पायनल टीबी’ अर्थात मणक्यांच्या क्षयरोगाचे प्रमाणही पाच टक्क्यांनी वाढले आहेत. मागच्या 10 वर्षांत एकूणच मणक्यांचे विकार 30 टक्क्यांनी वाढले आहेत. या विकारांना चुकीची जीवनशैली सर्वाधिक कारणीभूत असल्याने सकस, पौष्टिक आहार-विहार, सूर्यनमस्कार, पोहणे, श्वसनाच्या व्यायामांतून युवकांनी मणक्यांच्या विकारांना दूर ठेवावे, असा मौलिक सल्ला ‘स्पाइन सर्जरी’च्या कार्यशाळेत प्रख्यात स्पाइन सर्जन डॉ. केतन खुज्रेकर व डॉ. उदय फुटे यांनी दिला.

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलच्या वतीने रविवारी (19 जानेवारी) हॉटेल अजंता अँम्बेसेडर येथे ‘स्पाइन सर्जरी’ या विषयावर अस्थिरोगतज्ज्ञांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. पुण्यातील ‘संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक अँड रिहॅबिलिटेशन हॉस्पिटल’चे विभागप्रमुख व प्रसिद्ध स्पाइन सर्जन डॉ. खुज्रेकर, धूत हॉस्पिटलचे स्पाइन सर्जन डॉ. उदय फुटे यांनी पत्रकारांशी संवाद झाला. डॉ. खुज्रेकर म्हणाले, 15 ते 20 वर्षांपूर्वी पाठदुखी, कंबरदुखी, सायटिका, स्लीपडिस्क यासारखे मणक्यांचे विकार हे वयाच्या पन्नाशी-साठीनंतर दिसत होते. अलीकडे मात्र 20 ते 25 वर्षांपासूनच या विकारांचे रुग्ण दिसत आहेत. एवढेच नव्हे, तर मणक्यांचा क्षयरोगही (स्पायनल ट्यूबरक्युलॉसिस) लक्षणीयरीत्या वाढला आहे. पूर्वी क्षयरोग हा केवळ फुप्फुसांचाच असतो, असा लोकांमध्ये समज होता; परंतु मणक्यांचा क्षयरोगही एकूण मणक्यांच्या विकारांमध्ये तीन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढला आहे. पुण्यामध्ये आठवड्यात एखाद्या तरी अशा रुग्णाचे निदान होते. औरंगाबाद व मराठवाड्यामध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्याच वेळी गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेमुळे महिलांमध्येही हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे निरीक्षण डॉ. खुज्रेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना नोंदवले.

हे करा, निरोगी राहा

 • पुरेशा प्रमाणातील प्रथिने, कॅल्शियमसह
 • ठरावीक अंतराने घ्या समतोल आहार
 • धूम्रपान-मद्यसेवन टाळा, लवकर झोपा-उठा
 • सूर्यनमस्कार, पोहणे, अँरोबिक उपयुक्त
 • विकारग्रस्तांनी डॉक्टरी सल्ल्याने करावेत व्यायाम
 • मणक्यांच्या विकारांत ‘स्पाइन टीबी’चे रुग्ण


स्पायनल टीबी’ची कारणे अशी

 • प्रतिकारक्षमता कमी असणे
 • दीर्घकालीन आजार असणे
 • जंतुसंसर्गास वारंवार संधी मिळणे
 • मणक्यांच्या विकारांची कारणे
 • खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी
 • जंक फूडमुळे आलेला स्थूलपणा
 • चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव


100 अंशांत वाकलेले शरीर होते सरळ
अलीकडे सर्व प्रकारच्या मणक्यांच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे अतिशय सुलभ आणि सुरक्षित झाल्या आहेत. 98-99 टक्के शस्त्रक्रियांमध्ये अर्धांगवायू किंवा कोणतीही गुंतागुंत निर्माण होत नाही. एखाद्या-दुसर्‍या केसमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्यास तातडीच्या उपचारांनी रुग्ण बरा होऊ शकतो. कितीही प्रमाणात पाठीचे कुबड बाहेर निघत असेल किंवा पाठीचा कणा पार 100 अंशांनी वाकून शरीर वेडेवाकडे झालेले असले, तरी ‘स्पाइन सर्जरी’मुळे एकाच शस्त्रक्रियेत संपूर्ण शरीर अगदी सरळ होऊ शकते. अर्थात, या शस्त्रक्रियांसाठी अतिविशेष तज्ज्ञांची टीम लागते, असे डॉ. खुज्रेकर यांनी सांगितले.