सिल्लोड - औरंगाबाद जिल्ह्यात युती व आघाडी झाली असती तर निकालावर काय परिणाम झाला असता याचा विचार केल्यास शिवसेनेचा फायदा, तर भाजपचा तोटा झाला. कॉँग्रेसचा फायदा होऊन राष्ट्रवादीचा तोटा झाला असता. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीने घेतलेला निर्णय योग्य होता, असे आज म्हणता येऊ शकते.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात कॉँग्रेसचे राजेंद्र दर्डा आमदार होते. या मतदारसंघात एमआयएमने ६० हजार २६८ मतदान घेतल्याने भाजपचे अतुल सावे निवडून येऊ शकले. युती असती तर कदाचित मतविभाजन होऊन भाजपला फायदा होऊ नये म्हणून कॉँग्रेसला परंपरागत मतदान मिळाले असते व निकाल बदलला असता. त्याचप्रमाणे मध्य मतदारसंघातही झाले असते. प्रदीप जैस्वाल व किशनचंद तनवाणी या दोघांच्या मतांची बेरीज ८२ हजार ६३१ असून मतदारसंघातून विजयी झालेल्या एमआयएमच्या इम्तियाज जलीलपेक्षा वीस हजाराने जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल निवडून आले असते. पश्चिम मतदारसंघात कसेही गणित लावले तरी संजय शिरसाठच विजयी आले असते. युती नसल्याने औरंगाबाद शहरात भाजपचा एक आमदार झाला, तर शिवसेनेचा एक पडला. जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघात युती असती तर कदाचित भाजपच्या उमेदवाराचा फायदा झाला असता. वैजापूरची परिस्थिती पाहता यंदा फारसा फरक पडला नसता. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकरच निवडून आले असते. परंतु आघाडी असती
तर जागा कॉँग्रेसची असल्याने राष्ट्रवादीचा एकही आमदार जिल्ह्यात राहिला नसता.
युती तुटल्याचा सर्वाधिक फायदा भाजपला
युती तुटल्याने भाजपचा औरंगाबाद पूर्व, फुलंब्री व गंगापूर अशा तीन जागांचा फायदा झाला. मागच्या वेळी जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नव्हता, तर राष्ट्रवादीची पैठणची जागा गेली तरी वैजापूर आल्याने एक जागा कायम राहिली. कॉँग्रेसला औरंगाबाद पूर्व व फुलंब्री दोन जागांचे नुकसान झाले, तर शिवसेनेचे एका जागेचे नुकसान झाले. मध्य व वैजापूर गेली तरी पैठणची जागा आली. सगळ्यात भाजप फायद्यात राहिला. पैठण तालुक्यात अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचा फायदा झाल्याचे दिसते.