आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडू खासदारांचे खेळांबाबतच मौन; संसदेत सचिनने विचारले २ प्रश्न, मेरी कोमने एकही नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एखाद्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती राजकारणात आली तर त्या क्षेत्राचे भले व्हावे अशी सर्वांचीच माफक अपेक्षा असते. म्हणूनच आपल्या घटनेत विविध क्षेत्रांतील व्यक्तींना राज्यसभेत खासदार बनवण्याचा नियमही आहे. मात्र, क्रीडा क्षेत्रात महान कामगिरी करणारे आणि सध्या संसदेत खासदार असलेल्या खेळाडूंची खेळाबाबतची अनास्था दिसून येत आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ऑलिम्पिक पदक विजेती मुष्टीयोद्धा मेरी कोम, माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद आणि माजी फुटबॉलपटू प्रसून बॅनर्जी या खासदारांनी सध्याच्या संसदेत आतापर्यंत एकूण ८ प्रश्न विचारली आहेत. विशेष म्हणजे, क्रिकेटचा बादशहा सचिनने फक्त २ तर मेरी कोमने एकही प्रश्न विचारलेला नाही. विशेष म्हणजे कीर्ती आझाद हे वरिष्ठ खेळाडू आणि राजकारणी आहेत, परंतु त्यांचीसुद्धा खेळाबाबतची उदासीनता संसदेत विचारलेल्या प्रश्नांवरून दिसते. त्यांनी समग्रपणे २७१ प्रश्न विचारले असून त्यातील चारच खेळांसंबंधी आहेत. त्यातही प्रत्यक्ष खेळाच्या विकासाबाबत किंवा योजनांबाबत एकही प्रश्न नाही.
मास्टर ब्लास्टरचे खेळापेक्षा रेल्वेकडे अधिक लक्ष : भारताचा जगविख्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एप्रिल २०१२ मध्ये राज्यसभेत पाऊल ठेवले. तेव्हापासून आतापर्यंत त्याने एकूण १४ प्रश्न विचारले अाहेत. त्यापैकी केवळ दोनच प्रश्न खेळांशी संबंधित आहेत.
एक प्रश्न मैदानांचा उपयोग आणि दुसरा माजी खेळाडूंसाठी रोजगाराबाबत विचारला आहे. विशेष म्हणजे, त्याने विचारलेल्या एकूण प्रश्नांमध्ये रेल्वे आणि रस्त्यांशी संबंधीत सर्वाधिक ६ प्रश्ने आहेत. मागील ४ वर्षांत त्याने आतापर्यंत १३ दिवस संसदेत हजेरी लावली आहे. खासदार निधी खर्च करण्यात तो अाघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत ९८ टक्के निधी खर्च केला आहे.
मेरी कोम उपस्थिती, प्रश्न विचारण्यातही पिछाडीवर : बॉक्सिंगच्या रिंगणात प्रतिस्पर्ध्याला आपल्या पंचने गर्भगळीत करणारी ऑलिम्पिक पदकविजेती मुष्टियोद्धा मेरी कोमने शपथ घेतल्यापासून आतापर्यंत फक्त १४ दिवसच संसदेत उपस्थिती दर्शवली आहे. मात्र, या कालावधीत तिने एकदाही कोणत्याच विषयावर प्रश्न विचारलेला नाही.
क्रीडा समितीवर एकही खेळाडू नाही
चारही खेळाडू खासदारांनी राजकारणात येण्यापूर्वी मैदाने गाजवली आहेत. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील अनुभवही मोठा आहे. या चारही खेळाडूंपैकी एकही जण कोणत्याच क्रीडा समितीवर नाही. सचिन तेंडुलकर आणि प्रसून बॅनर्जी माहिती तंत्रज्ञानाच्या तर मेरी कोम आरोग्य आणि कुटुंब कल्याणाच्या तर, कीर्ती आझाद ग्रामीण विकासाच्या स्थायी समितीवर सदस्य आहेत.

इतर समस्यांवर भर
^ आम्ही क्रीडा क्षेत्रातून बाहेर पडलोय अन् मतदारसंघातील समस्यांवर फोकस करत आहोत. त्यामुळे खेळांशी संबंधित प्रश्नांवरच भर देत नाहीत. मात्र, क्रीडा समितीवर आमची नियुक्ती सरकारने करायला हवी होती. आम्ही विचारलेल्या शेकडो प्रश्नांपैकी काहीच पटलावर घेतात.
- कीर्ती आझाद, माजी क्रिकेटपटू, खासदार
बातम्या आणखी आहेत...