आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Srinagar Youngster Escape From Police Custody In Aurangbad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणीला फूस लावणार्‍या तरुणाने आणला पोलिसांना फेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडकोच्या गुलमोहोर कॉलनीतील एका सरकारी वकिलाच्या 16 वर्षीय मुलीला फेसबुकवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी विवाह करणार्‍या श्रीनगरमधील (जम्मू-कश्मीर) युवकाला सिडको पोलिसांनी 16 जुलै रोजी ताब्यात घेतले. पोलिस कोठडीतील या युवकाला तपासासाठी श्रीनगरकडे घेऊन जाणार्‍या पोलिसांच्या तावडीतून 27 जुलै रोजी कठुवा (जम्मू-कश्मीर) रेल्वे स्थानकाहून हा युवक पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे त्या पथकातील पाच जणांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

गुलमोहोर कॉलनीतील वकिलाच्या मुलीचे श्रीनगरमधील कुणाल नारायणदास अरोरा (21) याच्याशी फेसबुकवरून प्रेमसंबंध जुळले. नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन विशाखाने (नाव बदलले आहे.) अकरावीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळलेले असताना दोन वेळा कुणाल शहरात येऊन गेला. विशाखाने तिच्या आई-वडिलांशी त्याची ओळख करून दिली होती. प्रेमसंबंध सुरू असताना कुणालने विशाखासमोर काही दिवसांपूर्वी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिने त्याला होकार दिल्यानंतर 22 जून रोजी कुणाल शहरात आला. दुपारी एकच्या सुमारास विशाखा कुणालसोबत पसार झाली. हे दोघेही रेल्वेने मुंबईला गेले. तेथून विमानाने त्यांनी दिल्ली गाठली आणि यानंतर पुन्हा रेल्वेने ते श्रीनगरला गेले. दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास घरी परतलेल्या विशाखाच्या आई-वडिलांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी बदनामीच्या धाकाने कोणास काही एक न बोलता थेट श्रीनगर गाठले.

मात्र, या वेळी विशाखा कुटुंबीयांसोबत येण्यास तयार नव्हती. कुणालने विशाखाची बनावट कागदपत्रे तयार करून तिच्याशी आर्य समाज मंदिरात विवाह केला. विशाखा घरी परतत नसल्याने तिच्या वडिलांनी शेवटी 3 जुलै रोजी सिडको पोलिसांशी संपर्क साधत कुणाल व त्याचे वडील नारायणदास अरोरा (51) या दोघांविरुद्ध अपहरणाची तक्रार दिली.

कशासाठी नेले होते कुणालला?
विशाखा 16 वर्षांची असतानाही ती 20 वर्षांची असल्याचे बनावट प्रमाणपत्र कुणालने न्यायालयासमोर सादर केले होते. हे बनावट प्रमाणपत्र बनवणारे आणि 16 वर्षीय विशाखाचे लग्न लावून देणार्‍या आरोपींचा शोध घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत खटके यांच्यासह पाच जणांचे पथक कुणालला सोबत घेऊन श्रीनगरला गेले होते. सडपातळ बांधा असलेल्या कुणालने 27 जुलै रोजी रात्री कठुवा रेल्वे स्थानकादरम्यान पोलिस साखरझोपेत असताना हातकडीतून त्याचा हात अलगद बाहेर काढला. यानंतर तो रेल्वेतून पसार झाला. कुणाल पसार झाल्याचे लक्षात येताच पोलिसांची झोप उडाली. त्यांनी त्याचा बराच शोध घेतला. मात्र, तो सापडत नसल्याने पथकाने याची माहिती पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांना कळवली. यानंतर त्यांनी पथकाला माघारी बोलावून घेतले.

श्रीनगरात केली होती दोघांना अटक
अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सिडको पोलिसांचे पथक श्रीनगरला रवाना झाले. पोलिसांनी 16 जुलै रोजी कुणाल आणि नारायणदासला ताब्यात घेतले. त्यानंतर या दोघांना अटक करत 20 जुलै रोजी त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 29 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यादरम्यान विशाखाच्या वडिलांनी ती सोळा वर्षांची असल्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते, तर कुणालने ती 20 वर्षांची असल्याचे बनावट प्रमाणपत्र न्यायालयाला सादर केले होते. सध्या नारायणदासला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून तो हसरूल कारागृहात आहे.