आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञानाचे गणित सुटले! या शैक्षणिक वर्षापासून दहावी विज्ञान विषयासाठी दोन स्वतंत्र परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान विषयाची परीक्षा यंदापासून वेगवेगळ्या दिवशी घेण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी दिली. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासूनच हे बदल होणार असून विज्ञान एक आणि दोन असे वेगवेगळ्या दिवशी ४० गुणांचे दोन स्वतंत्र पेपर असतील. तसेच २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षाही होणार आहे.

बोर्डाच्या वतीने दरवर्षी मार्चमध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात. दरवर्षी परीक्षा पद्धतीत थोडेफार बदलही केले जातात. शैक्षणिक वर्ष २०१३ पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान एक आणि विज्ञान दोन हे विषय एकाच प्रश्नपत्रिकेत देण्यात आले होते. मात्र, दोन विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यास वेळ कमी पडत होता. परिणामी, गुणांवर तसेच एकूण टक्केवारीवर परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे हे विषय वेगळे करण्यात यावेत, अशी मागणीही पालक आणि विद्यार्थ्यांकडून वारंवार होत होती. या मागणीनुसार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काढलेल्या नवीन सूचनेप्रमाणे माध्यमिक शालांत परीक्षेत विज्ञान एक आणि दोन असे दोन स्वतंत्र पेपर असणार आहेत. तसेच विज्ञान एक आणि दोन या दोन्ही विषयांसाठी एकच सामायिक प्रात्यक्षिक परीक्षाही होणार आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या या निर्णयाबाबत बालविज्ञान विद्यामंदिर शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक तसेच बोर्डाच्या विज्ञान विषय समितीचे सदस्य बाळासाहेब चोपडे म्हणाले, इयत्ता दहावीच्या विज्ञान विषयासाठी यापूर्वी सीबीएसई पॅटर्न अवलंबण्यात आला होता. त्यामुळे ८० गुणांसाठी एकच परीक्षा घेतली जात होती. परंतु, तीन तासांत पेपर सोडवणे विद्यार्थ्यंाना अवघड जात होते. मार्च २०१६ पासून जुन्या पद्धतीनुसार दोन स्वतंत्र पेपर करण्यात आले आहेत. प्रत्येकी ४० गुणांच्या दोन पेपरसह प्रात्याक्षिक परीक्षाही होईल. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवणे शक्य होईल, पेपर सोडवण्यासाठी पुरेसा वेळही मिळेल.