आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचार्‍यांना मारहाणीचे सत्र सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - किरकोळ कारणांवरून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मारहाणीच्या घटना सातत्याने घडत आहे. आठवड्याभरात चार घटना घडल्या आहेत. सोमवारी पुन्हा बसचालकाला मारहाणीची घटना जिल्हा परिषदेजवळ घडली. सकाळी दहाच्या सुमारास सुटकार-जळगाव ही बस चोपड्याहून जळगावकडे येत असताना जिल्हा परिषदेजवळ बस न थांबविल्याच्या कारणावरून बसचालक आर.एन. ठाकरे (सुटकार, ता.चोपडा) यांना दोन प्रवाशांनी मारहाण केली. बसचालकाच्या तक्रारी वरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
आव्हाणे, कानळदा या मार्गावर सर्वाधिक मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. अंगावर पाणी उडाल्याने, सुट्या पैशांसह थांबा सोडून कुठेही बस न थांबविल्याच्या कारणावरून या घटना घडल्या आहेत. मात्र, या घटना घडल्यानंतर गुन्हेगार पोलिसांकडून तत्काळ मोकळे होत असल्याने या गुन्ह्यांना वचक बसत नसल्याच्या तक्रारी एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी केल्या आहे. आव्हाणे, कानळदा या मार्गावर जिल्हा परिषदेजवळील बसथांबा बंद करण्यात आला आहे. यासह सिग्नलवर प्रवासी उतरविणार्‍या बसचालकांना आर्थिक दंडही आकारण्यात येत आहे. असे असतानाही प्रवाशी या ठिकाणी उतरण्याचा अट्टाहास करतात. यातून वाद विवाद व मारहाणीच्या घटना घडतात. घटनेनंतर एसटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश चांगरे, इंटकचे नरेंद्रसिंग राजपूत, मनसेचे पांडुरंग सोनवणे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद केली. पोलिसांकडून गुन्हेगारांना कडक शासन होत नसल्याबद्दल निषेध व्यक्त केला.
सातत्याने घडणार्‍या या मारहाणी विरोधात आगारातील सर्वच कर्मचारी संघटना एकवटल्या आहेत. आठवड्याभरात ही तिसरी घटना असल्याने कर्मचार्‍यांकडून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हेगारांना कडक शासन होत नाही, ते आर्थिक देवाण घेवाणीतून तत्काळ मोकळे होतात. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. या विरोधात संघटनांचे प्रतिनिधी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून आपल्या व्यथा मांडणार आहेत.