आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी करणार टाटा बसला ‘टाटा’; आरामदायी बसची संख्या वाढवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अत्याधुनिक खासगी बसेसला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळ अनेक बदल करत आहे. अत्याधुनिक व्होल्व्हो बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेतच. त्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. शिवाय महामंडळाच्या ताफ्यातील टाटा कंपनीच्या बस टप्प्याटप्याने काढून घेण्यात येणार आहेत. देखभालीचा खर्च कमी असल्यामुळे टाटाच्या बसची जागा अशोक लेलँड कंपनीच्या बस घेतील, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी दिली.

हडको येथील राष्ट्रवादी भवनामध्ये बुधवारी (11 सप्टेंबर) राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचा विभागीय मेळावा व सत्कार सोहळा खासदार गोविंदराव आदिक यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी मार्गदर्शन करताना गोरे बोलत होते. संघटनेचे वरिष्ठ कार्याध्यक्ष बी. के. देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, कदीर मौलाना, मुश्ताक अहेमद, संजय जाधव, डी. आर. पाटील, मानसिंग राजपूत, जे. एस. ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोरे पुढे म्हणाले, मागील तीन महिन्यांत एसटीला 244 कोटींचा तोटा झाला. डिझेल दरवाढ, कर्मचार्‍यांचे वेतन, काही मार्गांवर प्रवाशांची कमी झालेली संख्या यामुळे उत्पन्नात घट होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटीच्या कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. खासगी पंपावरून डिझेल भरल्यामुळे एसटीची प्रति लिटर 12 रुपयाची बचत झाल्याची माहिती त्यांनी दिली.

या वेळी संघटनेचे ज्येष्ठ नेते मनोज उगले, बलभीम पाटील, संदीप जाधव, आर. डी. किवळीकर, ए. सी. तोटावार, वाय. जी. चौहान, आर. बी. काळे, बी. बी. तिकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. के. जी. गायकवाड, मानसिंग राजपूत, जे. एस. ढाकणे, आर. एस. कोलते, आर. ए. वहाटुळे यांनी मेळाव्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

मला बेरोजगार करू नका : महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गोरेंनी कामगारांचे प्रश्न तातडीने निकाली काढले. गोरे माझ्यासाठी काहीच काम ठेवत नसल्याने मी बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे, असा उपरोधिक टोला गोविंदराव आदिक यांनी लगावला.

संघटनेच्या मान्यतेसाठी लढा : एसटी महामंडळात 16 संघटना आहेत. सर्वाधिक सभासद आणि सक्रिय असलेली आमची संघटना असून संघटनेला मान्यता देण्यात यावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आतापर्यंत तडजोडीसाठी इतरांची मदत घ्यावी लागली. सर्व कर्मचार्‍यांनी एकजुटीने दबाव आणावा, असे मत संघटनेचे वरिष्ठ कार्याध्यक्ष बी. के. देशमुख यांनी व्यक्त केले. याशिवाय मंडळाच्या संचालकपदी कामगारांचा एक प्रतिनिधी नियुक्त करण्याची मागणी केली.

रिक्त जागा भरणार
मराठवाड्यात अशोक लेलँड कंपनीच्या 3 हजार बसेस आहेत, तर दोनशेवर बस टाटा कंपनीच्या आहेत. अशोक लेलँड कंपनीच्या बसेसला मेंटेनन्स कमी असल्याने त्या परवडतात. कोकणात महामंडळाला चालक, वाहक आणि मेकॅनिक मिळत नाहीत. तेथे तब्बल 2300 जागा रिक्त असून येत्या पंधरा दिवसांत जाहिरात काढण्यात येणार आहे. भरतीपूर्वी कोकणातून बदली करणार नाही, या अटीवर उमेदवार घेतले जातील, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.