आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीच्या कोंडीत बसची भर; आदेशाला ‘कट’ मारून चालकांची मनमानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांती चौक उड्डाणपुलाचे काम सुरू झाले त्या वेळी बाबा पेट्रोल पंपाकडून जाणार्‍या बसेसचा मार्ग बदलून तो वरद गणेश मंदिर ते मोंढा नाका मार्गे करण्यात आला. आता उड्डाणपुलाचे उद्घाटन होऊन महिने लोटले तरी त्याच मार्गावरून वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे बसेस पुन्हा पूर्वीच्याच मार्गावरून न्या, असे आदेश वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले. पण चालकांनी आदेशाला ‘कट’ मारून वरद गणेश मंदिराच्याच मार्गावरून वाहतूक सुरू ठेवली आहे. परिणामी या बसेसमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. महामंडळाचे अधिकारी मात्र वेगवेगळी उत्तरे देऊन संभ्रम निर्माण करत आहेत.

क्रांती चौक उड्डाणपुलाचे सन 2009 मध्ये काम सुरू झाले. त्यामुळे बाबा पेट्रोल पंपापासून पुढे जालना रोडवरील वाहतूक वरद गणेश मंदिरमार्गे वळवावी लागली. ओघानेच मध्यवर्ती बसस्थानकातून जालना रोड मार्गे जाणार्‍या व येणार्‍या बसेसचा मार्गही बदलण्यात आला. या बसेस मध्यवर्ती बसस्थानकातून निघून वरद गणेश मंदिर रोडमार्गे सिल्लेखाना व पुढे मोंढा नाक्यापासून जालना रोडवर जात होत्या, मात्र अजूनही हा मार्ग बदललेला नाही.

अधिकार्‍यांचा आदेश धाब्यावर
उड्डाणपुलाचे काम जुलै 2012 मध्ये पूर्ण झाले. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी वरद गणेश मंदिराचा मार्ग बदलून पुन्हा बसेस पूर्वीप्रमाणे बाबा पेट्रोल पंपमार्गे सिडकोकडे वळवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार विभाग नियंत्रक, कनिष्ठ व वरिष्ठ आगारप्रमुख आणि विभागीय व जिल्हा वाहतूक अधिकार्‍यांनी चालकांना सूचनाही केल्या, याला वर्ष उलटून गेले तरीही चालकांनी हा मार्ग बदललेला नाही. त्यामुळे शहरांतर्गतचा व गर्दीचा मार्ग असलेल्या वरद गणेश मंदिर मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. आधीच या रस्त्याच्या दुतर्फा वसाहती, बाजारपेठ व इतर कार्यालयांकडे जोडणारे रस्ते असल्याने त्यात बसगाड्यांच्या वाहतुकीची कोंडी होत आहे. गुलमंडी, औरंगपुरा, खडकेश्वर, रविवार बाजार, जुना मोंढा तसेच बँका, शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय प्रतिष्ठाने याकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर असल्याने या मार्गावर नेहमी गर्दी असते.

या बसेस वापरतात चुकीचा मार्ग
वाहतूक शाखा आणि राज्य परिवहन महामंडळाच्या आदेशाला फाटा देत पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, शिर्डी, धुळे, गुजरातकडून येणार्‍या बस अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, बुलडाणा, जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, अकोला, हैदराबाद, गुलबर्गा, परतूर, रिसोड, अंबड या परगावी जाणार्‍या गाड्यांनी सिडकोकडे जाताना हा शॉर्टकटचा पर्यायी मार्ग चालूच ठेवला आहे.

जालना रोडऐवजी जळगाव रोड
मुळात बाबा पेट्रोलपंप मार्गे सिडको बसस्थानकाकडे जाण्याऐवजी मध्यवर्ती बसस्थानक ते मिल कॉर्नर, भडकल गेट, टाऊन हॉल उड्डाणपूल, अण्णाभाऊ साठे चौक, दिल्ली गेट, हसरूल टी पॉइंटमार्गे जळगाव रोडने सिडको बसस्थानक हा मार्ग निश्चितच खूप सोयिस्कर आहे. शिवाय हा मार्ग अधिकृतही करण्यात आलेला आहे. पण तरीही या मार्गाचा क्वचितच वापर केला जातो. हा मार्ग वापरल्यास जालना रोडवरील वाहतुकीचा भारही कमी होईल.

काय म्हणतात जवाबदार
उड्डाणपुलाचे काम संपले आहे. त्यामुळे पुन्हा जुना मार्ग वापरल्यास वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटेल. माझ्या काळात मी पत्र दिलेले नाही. आमच्या विभागाने पूर्वी दिले असेल तर मी माहिती घेऊन राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठांशी चर्चा करतो.
-अजित बोर्‍हाडे,सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

वरद गणेश मंदिर ते मोंढा नाका हा मार्ग शॉर्टकट म्हणून वापरला जातो. चालकांना अनेक वेळा तोंडी आदेश दिलेले आहेत. या मार्गाने बसफेर्‍या बंद करण्याच्या लोकांच्याही तक्रारी आहेत, पण चालक मनमानी करतात. त्यांच्यावर आता
कडक कारवाई करणार
-एस. टी. सोनवणे, कनिष्ठ आगारप्रमुख

सर्वच बस या मार्गाने जातात. शहर बसही याच मार्गाने जाते. आमच्याकडे अद्याप लोकांची वा वाहतूक पोलिसांची तक्रार आलेली नाही.
-संजय सुपेकर,विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

उड्डाणपुलाचे काम संपल्यांनंतर वरद गणेश मंदिर ते मोंढा नाका हा मार्ग बंद करून बाबा पेट्रोलपंप मार्गाने बसेस वळवण्याचा आदेश दिला होता.
-पी. पी. देशमुख, विभागीय वाहतूक अधीक्षक

मध्यवर्ती बसस्थानक ते मिल कॉर्नर,भडकल गेट, टाऊन हॉल, हसरूल टी पॉइंट मार्गे जळगाव रोड या कमी वर्दळीच्या मार्गावरून सिडको बसस्थानक हा मार्ग निश्चित करून दिलेला आहे. मात्र, या मार्गावरून क्वचितच बस जातात. असे झाले तर जालना रोडवरील वाहतूक कोंडीही कमी होईल. <ऊ्र58ं -किशोर सोमवंशी, वरिष्ठ आगारप्रमुख

वरद गणेश मंदिर रोडमार्गे सिल्लेखाना व पुढे मोंढा नाक्यापासून जालना रोडवर बसेस जात असल्याने जागोजागी वाहतुकीची अशी कोंडी होते.