आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई भत्त्याचे 63 कोटी एसटी महामंडळाकडे थकीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे वर्ग तीन व चारच्या 1 लाख 7 हजार कर्मचार्‍यांचे महागाई भत्त्याचे 63 कोटी रुपये थकीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात जिल्ह्यातील 2120 कर्मचार्‍यांचे 1 कोटी 71 लाख रुपये मंडळाला देणे आहे. महागाई भत्ता लागू होऊन अकरा महिने उलटूनही कर्मचार्‍यांना एक छदामही मिळालेला नाही.

महामंडळाकडून कर्मचार्‍यांना सध्या 65 टक्के प्रमाणे महागाई भत्ता देण्यात येतो. मात्र, महागाईमुळे ही रक्कम कमी असल्याने सात टक्के वाढीव भत्ता देण्याची मागणी कर्मचार्‍यांकडून केली जात होती. त्यानुसार महामंडळाने जुलै 2012 मध्ये वाढीव भत्ता लागू केला. एका कर्मचार्‍याच्या वेतनात तीनशे ते एक हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, वाढीव भत्ता लागू होऊन अकरा महिने उलटूनही वाढीव भत्त्यातील एक छदामही कर्मचार्‍यांना मिळाला नाही. एस. टी. महामंडळाकडे निधी उपलब्ध नसल्याने वाढीव महागाई भत्त्याची रक्कम कर्मचार्‍यांना मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. कर्मचार्‍यांना महागाई भत्ता व वेतन देण्यासाठी राज्य शासनाकडून कर्ज घेण्यात आले असून लवकरच महागाई भत्ता दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचार्‍यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्याचे 12 मार्च रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले आहे. किमान वेतनाच्या फरकाची रक्कम 20 जुलै 2010 पासून देणार असून 25 हजार कर्मचार्‍यांना याचा लाभ होणार आहे. दोन वर्षांतील फरकाच्या रकमेपोटी एका कर्मचार्‍याला 25 ते 40 हजार रुपये मिळतील. हा नियम लागू केल्यापासून दरमहा वेतनात तीन ते चार हजार रुपयांची वाढ झाली आहे. एसटी महामंडळाला फरकाची 114 कोटी रुपये, तर दरवर्षी 128 कोटी कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचार्‍यांना द्यावे लागणार आहेत. किमान वेतनासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने उच्च् न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने कर्मचार्‍यांना वेतन देण्याची आदेश दिले होते.

एसटी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन
कर्मचार्‍यांचा फायदा
> राज्यात सध्या वर्ग तीन व चार चे 1 लाख 7 हजार 596 कर्मचारी आहेत.
> त्यांच्या वेतनावर महिन्याला 169 कोटी रुपये खर्च केले जातात.
> महागाई भत्ता लागू झाल्याने वेतनात 300 ते 1 हजार रुपयांची भर पडणार.
> यासाठी महामंडळाला महिन्याला सात कोटी रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.
> 2120 कर्मचारी असून त्यांच्या वेतनावर दरमहा 4 कोटी 8 लाख खर्च केले जातात.

महामंडळाला तोटा
महामंडळाला दरमहा सात कोटींची जास्त रक्कम भरावी लागणार असल्याने मंडळाच्या तिजोरीवर भार पडणार आहे. तसेच 9 महिन्यांची बाकी असलेले 63 कोटीही द्यावे लागणार असल्याने महामंडळाला शासनाकडून 200 कोटी रुपये कर्ज घ्यावे लागले आहे.

महागाई भत्ता मिळालाच पाहिजे
महाराष्ट्र राज्य एस. टी.वर्कर्स काँग्रेस इंटक च्या वतीने नऊ मार्च 2013 रोजी व्यवस्थापकीय उपाध्यक्ष दीपक कपूर यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे. महागाई भत्ता कर्मचार्‍यांच्या हक्काचा असून तो मिळालाच पाहिजे.’’
-मुकेश तिगोटे, कार्याध्यक्ष इंटक

मान्यता प्राप्त संघटना कमी
''मान्यता प्राप्त संघटनेने हा भत्ता मिळवून द्यायला पाहिजे होता. मात्र, तसे झाले नाही; परंतु आम्ही हा भत्ता मिळवून देऊ. ’’
-आमदार जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष इंटक

पुढील आठवड्यात भत्ता देऊ
''पुढील आठवड्यात महागाई भत्ता देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी शासनाकडून कर्ज घेतले आहे. धनादेशही तयार आहे. शासनाची परवानगी मिळताच महागाई भत्ता देऊ. ’’
-जीवन गोरे, अध्यक्ष एस. टी. महामंडळ