आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटी गाशा गुंडाळायच्या तयारीत, मनपाची मात्र काहीच तयारी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनपाची लालपरी बंद पडल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा सुरू केली. मात्र, अपुरे कर्मचारी, वाहनांची कमी संख्या आणि चुकीचे नियोजन यामुळे महामंडळाचे शहर बसचे गणित बघडले आहे. आतापर्यंत मंडळाला तब्बल ६.२५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे मंडळ कधीही शहर बस सेवा बंद करू शकते. तर, दुसरीकडे स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाऱ्या मनपाने मात्र अद्याप वाहतूक सुविधेचा कोणताही पर्याय उभा केलेला नाही. या सर्व प्रकारात सामान्य औरंगाबादकर मात्र भरडला जात आहे.

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वास्तविक महानगरपालिकेची आहे. मात्र, मनपाच्या लालपरीचे चाक २०११ मध्ये थांबले. त्यानंतर काही दिवसांनी परिवहन महामंडळाने शहरात बससेवा पुरवण्यास सुरुवात केली; पण दरम्यानच्या काळात शहरवासीयांनी पर्यायी व्यवस्था शोधली आणि बसवरची निर्भरता कमी केली. याच वेळी शेअरिंग आणि सिक्स सीटर रिक्षांचे पेव वाढले. नंतरच्या काळात आलेल्या महामंडळाच्या शहर बसची रिक्षांशी स्पर्धा करताना दमछाक झाली. त्यामुळे महामंडळाला फायद्याचे गणित काही जुळवता आले नाही आणि आजघडीला शहर बसमुळे त्यांना सव्वासहा कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. शहरात वाहतूक सेवा पुरवण्याची जबाबदारी नसतानाही महामंडळाने शहर बस सुरू केली. मात्र, आर्थिक नुकसान होत असल्याने यापुढे शहर बस चालवण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहत असलेल्या मनपाने सार्वजिनक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उभा करण्यापूर्वीच महामंडळ मात्र ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या तयारीत आहे.

औरंगाबादला हवा १५० बसेसचा ताफा
महामंडळाच्याअधिकाऱ्यांशी शहर बसविषयी चर्चा करत असताना प्रवाशांना सेवा देणे फार अवघड नाही, आपणही पुणे, मुंबईप्रमाणे शहर बस चालवू शकतो. शिवाय यातून नफाही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, यासाठी १५० बसेसची आवश्यकता आहे. तितक्याच प्रमाणात चालक आणि वाहकांची (प्रत्येकी १५०) नियुक्तीही करावी लागेल; पण सध्या महामंडळ ही सुविधा पुरवण्याच्या स्थितीत नाही, असेही त्यांनी सांगितले. आता मनपा शहरबसचे शिवधनुष्य कसे पेलते, हा प्रश्न आहे.
मिळकतीपेक्षा खर्चच जास्त
1 ते 29 जून दरम्यान एसटीने २९ दिवसांत ४० लाख १६ हजार इतके पैसे जमवले. यात २९ जून रोजीची एसटीची मिळकत लाख ६३ हजार इतकी आहे. मात्र, एसटीला प्रतिकिमी ३२ रुपये इतका खर्च येतो आणि एका दिवशी एसटी ७००७ किमी इतकी धावते. यानुसार एका दिवसात लाख २४ हजार इतका खर्च येतो. यावरून प्रतिदिन ६१ हजारांचा तोटा सहन करत आहे.


केवळ ११ रस्त्यांवरून धावताहेत बस
सध्यामंडळाकडे ५६ बसेस उपलब्ध असून केवळ २९ बसेस सुरू आहेत. शहरातील फक्त ११ मुख्य रस्त्यांवरून या बसेस धावत आहेत. यात औरंगपुरा ते बजाजनगर, औरंगपुरा ते रांजणगाव, चिकलठाणा ते मध्यवर्ती बसस्थानक, शहागंज ते रेल्वेस्टेशन, औरंगपुरा ते हिंदुस्थान आवास, औरंगपुरा ते शिवाजीनगर, रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पाॅइंट (मध्यवर्ती बसस्थानकमार्गे), रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉइंट, रोपळेकर हॉस्पिटल, गजानन मंदिरमार्गे, सिडको ते मध्यवर्ती बसस्थानक एम-२ मार्गे, औरंगपुरा ते वाळूज आणि चिकलठाणा ते औरंगपुरा या ११ रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय बहुतांश नफा मिळवून देणाऱ्या रस्त्यांवर शहर बस धावत नाही. पर्यायाने आर्थिक गणित बघडत आहे.

का पडला तोट्याचा गिअर?
अपुऱ्यागाड्या, कर्मचारी नसणे आणि ढिसाळ नियोजनामुळे शहर बसचा रिव्हर्स गिअर पडलेला दिसतो. महामंडळ रिक्षा हे तोट्याचे कारण सांगत असले तरी शहरात बसथांबे नसण्यापसून वेळेवर बस सोडणे, अपुऱ्या फेऱ्या, विद्यापीठासारख्या मिळकतीच्या ठिकाणी बस पाठवणे, मिनीबसचा वापर करणे, एकंदर प्रवासी हे दैवत असल्याचा विसर पडल्याने उदासीन महामंडळाने स्वत:च शहर बसला तोट्यात ढकलले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

रिक्षांनी ‘बस’वला धंदा
गेली अनेक वर्षे रिक्षाचालक शहर बसचे प्रवासी पळवत आहेत. बसथांब्यावर त्यांनी अक्षरश: ताबा मिळवलेला आहे. त्यामुळे शहर बस तोट्यात चालली आहे. हे चित्र बदलायचे असेल तर शहरातील अवैध रिक्षांवर कडक कारवाई होणे आणि मुदत संपलेल्या रिक्षा स्क्रॅप करणे गरजेचे आहे.

मनपाने एनओसीची मागणी केल्यास लगेच देऊ
शहर बस चालवणे ही महामंडळाची जबाबदारी नाही, तरीही गेली पाच वर्षे आम्ही शहरात बस सेवा देत आहोत. मात्र, सध्या महामंडळाला सव्वासहा कोटींचा तोटा झालेला आहे. शहरासाठी १५० वर बसेस आणि चालक-वाहकांची गरज आहे. आता शहर बस चालवण्याची तयारी नाही. मनपाने एनओसीची मागणी करताच, ती लगेच देऊत. एस.एस. रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी, महामंडळ
बातम्या आणखी आहेत...