आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Standing Committee Against Mayors, Latest News, Divya Marathi

मनपात स्थायी समिती विरुद्ध महापौर संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आधीच बजेटमध्ये कामे घुसवायला जागा नाही आणि तुम्ही खुशाल कामे वाटून टाकली. महापौर म्हणून मी नगरसेवकांना कोणत्या तोंडाने सामोरे जाणार, असा सवाल करत महापौर कला ओझा यांनी स्थायी समिती सभापती नारायण कुचे यांना सुनावले. प्रशासनाने तयार केलेल्या कडेकोट बजेटमध्ये प्रशासकीय खर्चाला आणि अनावश्यक तरतुदींना फाटा देत स्थायी समितीने 113 कोटींची कामे घुसवल्याने आता सर्वसाधारण सभेला कामे घुसवणे अशक्य बनणार आहे.
गेल्या शुक्रवारी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सादर केलेल्या प्रशासनाच्या 549 कोटींच्या बजेटमध्ये काल स्थायी समितीने 113 कोटी रुपयांची कामे घुसवत बजेट 662 कोटींवर नेऊन टेकवले. आता बुधवारी हे बजेट सर्वसाधारण सभेसमोर येईल. त्याआधी मंगळवारी बजेटचा महापौरांनी आढावा घेतला आणि त्यात आता फारशी जागा नसल्याचे समोर आल्याने त्या संतापल्या.
100 कोटींची अपेक्षा होती
सभापती नारायण कुचे आणि महापौर यांच्यात बैठक झाली आणि महापौरांनी आपला राग स्पष्ट शब्दांत व्यक्त केला. सर्वसाधारण सभेत किमान 50 ते 100 कोटींची कामे वाढवण्याची तयारी चालू असताना आता फार तर 10 ते 20 कोटींचीच कामे टाकता येतील हे लक्षात आल्याने त्यांना राग आला. स्थायी समिती सदस्य, पदाधिकार्‍यांनीच निवडणुकीच्या वर्षात कामांवर डल्ला मारल्याने सामान्य नगरसेवकांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली. त्यांनी पदाधिकार्‍यांशी बोलताना आपला संताप मोकळेपणाने व्यक्त केला. भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे आज मनपात आले होते. त्यांना भाजपच्या नगरसेवकांनी भंडावून सोडले. शिवसेनेने जेवढय़ा रकमेची कामे घेतली आहेत तेवढय़ाच रकमेची कामे भाजपच्या वॉर्डात करा, असा समान वाटपाचा मुद्दा त्यांनी मांडला. 30 लाखांत बोळवण झालेल्या काही नगरसेवकांनी तर निवडणुकीत आमच्या वॉर्डातून लीडची अपेक्षा ठेवणे चुकीचे असल्याचे सांगितले.
बुधवारी सकाळी 11 वाजता स्थायी समितीची तर दुपारी 3 वाजता सर्वसाधारण सभेची बैठक होत आहे. मात्र, आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या वृत्तानुसार उद्या सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास निवडणूक आयोगाच्या पत्रपरिषदेत निवडणुकीची घोषणा होईल. त्यामुळे उद्याच्या दोन्ही बैठकांवर आचारसंहितेचे सावट असून या बैठका होणार की नाही हे सकाळी ठरेल, असे सूत्रांनी सांगितले.