आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Standing Committee Issue Of Aurangabad Municipal Corporation

स्थायी समितीची बैठक येताच मनपाची होर्डिंगवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मागच्या स्थायी समिती - च्या बैठकीत बेकायदा होर्डिंगबाबत गदारोळ झाल्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी काढल्यावर तीन दिवस ती मोहीम चालली. मध्यंतरी बंद पडलेली मोहीम उद्याच्या स्थायी समिती बैठकीच्या तोंडावर आज पुन्हा उरकण्यात आली. आज पाच होर्डिंग काढण्यात आले. विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही बेकायदा होर्डिंगबाबत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
मागील महिन्यात स्थायी समितीत होर्डिंगचा विषय उपस्थित झाला होता. मनपाने होर्डिंग धोरण तयार केले नसल्याने मनपाचे मोठे उत्पन्न बुडत असल्याची टीका करण्यात आली. तसेच शहरात नोंदणी नसणारे शेकडो होर्डिंग बिनदिक्कत लावण्यात आली असून त्यांचाही महसूल बुडत आहे. अशा स्थितीत या बेकायदा होर्डिंगवर कारवाई करावी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश सभापती विजय वाघचौरे यांनी दिले होते. त्यानंतर तीन-चार दिवस मनपाच्या पथकांनी ही कारवाई केली. या मोहिमेचा उत्साह लवकरच मावळला ती थांबली.
उद्या बुधवारी स्थायी समीतीची बैठक होणार असल्याने आज मंगळवारी मनपाच्या होर्डिंग हटाव पथकाला पुन्हा जाग आली शहरात कारवाई करत पाच होर्डिंग हटवण्यात आले. त्यात क्रांती चौकातील उपेंद्र पब्लिसिटीचे एक, काल्डा काॅर्नर अमरप्रीत चौक येथील अनिल अॅड एजन्सीचे दोन होर्डिंग पथकाने जप्त केले. शिवाय सिडको एन-२ येथील एक अभिषेक अॅड एजन्सीचे मोंढा नाक्यावरील होर्डिंग या पथकाने हटवले. नगररचना सहायक संचालक डी. पी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एस. डी. काकडे, सय्यद जमशीद आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

आज चर्चा होणार
होर्डिंगबाबतमनपा प्रशासन करत असलेली कारवाई थातूरमातूर असल्याचे सांगत याबाबत स्थायी समितीत प्रशासनाला जाब विचारू, असे सभापती विजय वाघचौरे यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले.
बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे स्थायी समितीचे आदेश असतानाही एकाही प्रकरणात आतापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. केवळ होर्डिंग जप्त करून त्यांची मनपाच्या आवारात थप्पी लावण्यापलीकडे काहीही करण्यात आलेले नाही. याच जागांवर लवकरच नव्याने होर्डिंग लागण्याची शक्यता त्यामुळेच वाढली आहे.