आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचतारांकित डेक्कन ओडिसीत आले केवळ पंधरा पर्यटक, नियोजन ताजऐवजी कॉक्स अँड किंग्जकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ओडिसी पंचतारांकित रेल्वेला चालविताना सर्व सुविधा एका छताखाली आणण्यासाठी सेवा क्षेत्राचा फारसा अनुभव नसलेल्या कॉक्स अँड किंग्ज या ट्रॅव्हल एजन्सीला नवीन पार्टनर बनविण्यात आले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास एजन्सी ठरविण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला. रेल्वेकडून उशिरा मिळालेली परवानगी व पुरेशा प्रसिद्धीअभावी पर्यटकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे कारण पुढे केले जात आहे. रविवारी अठ्ठ्याऐंशी पर्यटकांची क्षमता असलेल्या रेल्वेत केवळ पंधराच पर्यटक होते.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व भारतीय रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी या पंचतारांकित सुविधा असलेल्या रेल्वेचे देशभरात दहा (सर्किट) मार्ग तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ओडिसीची चाळीस टक्के पर्यटनस्थळे ही महाराष्ट्रात ठेवण्यात आली आहेत. डेक्कन ओडिसीचे दर प्रतिव्यक्ती तीन लाख ते पावणेसात लाख रुपये इतके आहेत. यात महाराष्ट्रातील अभयारण्य व धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. ओडिसी नफ्यात असल्याचा दावा केला जात असताना पंधरा पर्यटकांच्या संख्येवरून ओडिसीचा नफ्याचा दावा फोल ठरत आहे. महाराष्ट्रासह इतर प्रांतांमधील श्रीमंत पर्यटकांनी महाराष्ट्रात यावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी रेल्वेचा राज्याबाहेर विस्तार करण्यात आला आहे. यापूर्वी ओडिसीचे नियमन तीन वेगवेगळ्या एजन्सीमार्फत केले जात होते. ताज हॉटेल ग्रुपकडे निवास व भोजनाची व्यवस्था होती. इतर सुविधा दोन एजन्सीमध्ये विभागण्यात आल्या होत्या. नवीन रचनेत सर्व सेवा सुविधा कॉक्स अँड किंग्जला देण्यात आल्या आहेत.
भारतात पाच लक्झरी रेल्वे : चीनसारख्या मोठ्या देशात लक्झरी सुविधा देणाऱ्या दोनच रेल्वे आहेत. युरोपात काही देशांत मिळून एक रेल्वे असून अमेरिकेसारख्या देशातही अशा रेल्वेंची संख्या दोनच आहे. पूर्वी भारतात पॅलेस ऑन व्हिल व महाराष्ट्रात डेक्कन ओडिसी होती. यानंतर रेल्वेच्या पर्यटन विभाग, कर्नाटक व आंध्र प्रदेश भारतामध्ये पाच लक्झरी रेल्वे चालतात.

डेक्कन ओडिसी फायद्यात : डेक्कन ओडिसी रेल्वे मागील तीन वर्षांपासून फायद्यात आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा प्रभाव रेल्वेवर काही काळ पडला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा परदेशी पर्यटकांचा ओघ सुरू झाला. भारतातील उच्च मध्यमवर्गीय रेल्वेचे ग्राहक आहेत. निवृत्त कर्मचारीही रेल्वेने पर्यटन करतात. पुरेशा प्रमाणावर प्रवासी मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
रेल्वेची वैशिष्ट्ये : रेल्वे एकवीस डब्यांची असून यातील १२ डब्यांचा समावेश पर्यटकांसाठी करण्यात आला आहे. प्रत्येक डब्यात आठ पर्यटक असतात. दोन प्रेसिडंट सूट असून या सूटचा दर व दर्जाही अत्युच्च आहे. एक कॉन्फरन्स डबा, दोन डायनिंग डबे, दोन जनरेटर कार, स्टाफसाठी दोन डबे, एक बार, स्पा कार, टी. व्ही., केबल कनेक्शन, मध्यवर्ती ऑडिओ डिस्क प्लेअर, सेल फोन, चॅनल म्युझिक, फॉरिन एक्स्चेंज आदी सुविधा आहेत. पर्यटनस्थळांची वातानुकूलित गाडीतून पाहणी व पंचतारांकित हॉटेलची निवास व्यवस्था केली जाते.
केव्हा धावते रेल्वे? : डेक्कन ओडिसी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान धावते. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान रेल्वेत पर्यटकांची गर्दी असते. रेल्वेचे आरक्षण करताना वीस टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित ऐंशी टक्के रक्कम रेल्वे निघण्याच्या ४५ दिवसांपूर्वी भरावी लागते. आरक्षण ५९-४५ दिवसांपूर्वी रद्द केल्यास २० टक्के रकमेची कपात होते. ४४-३० दिवसांपूर्वी रद्द केल्यास पन्नास टक्के तर २९ दिवसांपूर्वी रद्द केल्यास परत रक्कम मिळत नाही.
रेल्वेचे दर असे : पंचरातांकित सुविधांनी युक्त डेक्कन ओडिसीमध्ये दोनच श्रेणी आहेत. डिलक्स केबिनमध्ये एका व्यक्तीसाठी ५०७५ डॉलर, जोडप्यासाठी ७३५० डॉलर तर लहान मुलासाठी (५-१२) ७३५ डॉलर आहे. प्रेसिडेन्शियल सूट एका व्यक्ती अथवा जोडप्यासाठी ११०२५ डॉलर आहे. जोडप्यात एक मुलास मान्यता देण्यात आली आहे. २०१४ ते २०१४ साठीचा कालावधी निश्चित केला आहे. ४ ऑक्टोबर, १ व २९ नोव्हेंबर, २७ डिसेंबर, २४ जानेवारी १५, २१ फेब्रुवारी १५, १४ मार्च १५, ५ व २६ सप्टेंबर १५ या काळात ओडिसी धावेल.
घेतल्या जाणाऱ्या रकमेच्या तुलनेत सुविधा तुटपुंज्या
^डेक्कन ओडिसीचे दर सर्वसाधारण पर्यटकाच्या आवाक्याबाहेर आहेत. परदेशी पर्यटकांसाठीची रेल्वे असल्याने सुविधा त्या दर्जाच्या देणे जरूरी आहे. पर्यटकांकडून घेतल्या जात असलेल्या रकमेच्या तुलनेत सुविधा तुटपुंज्या असल्याने प्रतिसाद हवा तसा मिळत नाही.- संतोषकुमार सोमाणी, संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना.

एमटीडीसीला मिळतात १ कोटी १२ लाख रुपये
नवीन एजन्सीकडून एमटीडीसीला १ कोटी १२ लाख रुपये मिळतात. याशिवाय व्यवसाय जास्त झाला, तर अतिरिक्त रक्कम एमटीडीसीला अपेक्षित आहे. पाच वर्षांसाठीचा करार असून सेवा सुविधांसंबंधी पर्यटकांकडून चांगल्या प्रतिक्रिया आल्या, तर बक्षीस स्वरूपात जास्तीची रक्कम दिली जाईल आणि तक्रारी आल्या तर या रकमेत कपात केली जाईल.