आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘स्टार प्रवाह’च्या औरंगाबादेतील ऑडिशनला प्रचंड गोंधळ; पहाटेपासून पावसात रांगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कोसळणारा पाऊस, त्यापासून कसलेच संरक्षण नाही, पहाटेपासून लागलेल्या रांगांत चिमुकले हौशी कलावंत आणि त्यांच्या दुप्पट हौशी- महत्त्वाकांक्षी पालकांना रविवारी रिअँलिटी शोच्या ऑडिशनने भयंकर रिअँलिटीचे दर्शन घडवले. पावसाचा मारा, ओरड केल्यावर आत येण्यासाठी दार उघडताच चेंगराचेंगरी, त्या गोंधळात हरवलेल्या लेकरांना शोधताना रडणार्‍या आया, फॉर्म घेण्यासाठी गोंधळ आणि एवढे सारे होत असताना हा गोंधळ शमवण्याऐवजी रांगांचे शूटिंग करीत ‘टीआरपी’ची सोय करण्यात गुंतलेले आयोजक असा अनागोंदी आणि संतापजनक प्रकार रविवारी घडला. या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार’ या नव्या रिअँलिटी शोसाठी रविवारी शारदा मंदिर शाळेत ऑडिशन घेण्यात आली. 6 ते 12 वयोगटातील चिमुकल्यांचे नृत्य कौशल्य जोखणार्‍या या ऑडिशनच्या नावाखाली औरंगाबादकरांना निव्वळ छळ सहन करावा लागला. ‘दिव्य मराठी’ने या प्रकारावर प्रकाशझोत टाकल्यानंतर अनेक पालकांनी आपल्याला आणि आपल्या मुलांना काय त्रास सहन करावा लागला याची माहिती दिली. शहरातील एक व्यावसायिक राहुल बोधनकर, त्यांच्या पत्नी शर्वरी बोधनकर हे त्यांच्या 6 वर्षांच्या मुलीला या ऑडिशनसाठी घेऊन आले होते. त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दांत-

शारदा मंदिरच्या गेटबाहेर पहाटे पाचपासून रांगा लागल्या होत्या. मुले, त्यांचे पालक भरपावसात उभे होते. ऑडिशन सकाळी 8 वाजता सुरू होणार होती. गेटवर दोन सुरक्षा रक्षक होते. सातच्या सुमारास एकेका विद्यार्थ्याला शाळेच्या कंपाउंडमध्ये घेण्यास सुरुवात झाली. शहरातील भाऊ-दादा आपले वजन वापरून त्यांच्या मुलांना आत घुसवत होते.

रांग वाढली तशी पावसात भिजणार्‍या लोकांनी ओरड सुरू केली. मग गेट उघडण्यात आले आणि एकच गोंधळ उडाला. प्रचंड ढकलाढकली, चेंगराचेंगरी झाली. बाहेरचा लोंढा एकाच वेळी आत घुसला आणि मैदानात लोक जमले. तेथेही पावसामुळे थांबायची सोय नव्हती. मैदानातील स्टेजला छत असल्याने तेथे प्रचंड गर्दी जमली. त्यात तीन ते चार मुले हरवली. त्यांच्या आयांना रडू आवरेना झाले. इकडे गर्दीमुळे घाबरलेल्या मुलांनीही रडणे सुरू केले.

पोलिस म्हणतात, माहीत नाही
साडेसात वाजेच्या सुमारास चेंगराचेंगरी होते की काय, अशी स्थिती दिसल्याने मी 100 ला फोन केला. त्यांना परिस्थिती सांगून पोलिस पाठवा, अशी विनंती केली. आयोजकांनी आम्हाला कळवले नसल्याने पाठवता येणार नाही, असे उत्तर मिळाले. त्यावर माणसे मेली, दंगल झाली तर याल का, असे विचारल्यावर पाठवतो, पाठवतो, असे कंट्रोल रूममधून सांगण्यात आले. इकडे शाळेच्या आवारात गोंधळ सुरूच होता. फॉर्म घेण्यासाठी पालकांची गर्दी उसळली. गोंधळ उडाला.

पोलिस आले मुलांना घुसवायला
हा गोंधळ सुरू असताना रेनकोट घालून काही पोलिस आल े; पण त्यांच्यासोबत त्यांची मुले होती. रांगेत समोर उभे राहत या पोलिसांनी आपल्या मुलांना घुसवण्याचे काम केले. मात्र, गर्दी आवरणे, रांग लावणे हे त्यांनी केलेच नाही.

भुकेल्या मुलांचा अनन्वित छळ
पहाटेपासून आलेली मुले भुकेली होती. त्यांना काही खाऊ घालण्यासाठी नेता येईल का, याची चाचपणी पालकांनी केली असता शाळेच्या आवारातून एकदा बाहेर गेल्यावर पुन्हा आत येता येणार नाही, असे सांगितल्याने पालकांना आपल्या भुकेल्या लेकरांना काहीही खाऊ घालता आले नाही. एवढेच नव्हे, तर शाळेच्या इमारतीत ऑडिशन असल्याने इमारतीतील टॉयलेटचा वापर करण्यासाठीदेखील मुलांना आत सोडण्यात आले नाही.

टीआरपी वाढीसाठी व्हिडिओ शूटिंग
हा गोंधळ सुरू असताना स्टार प्रवाहची टीम गर्दीचे व्हिडिओ शूटिंग करीत होती. त्यातील राहुल या तरुणाला विचारले असता त्याने हे फुटेज आम्ही प्रमोशनमध्ये वापरणार. टीआरपीला ते आवश्यक असते, असे उत्तर दिले. ऑडिशनचे व्यवस्थापन का करीत नाही, असे विचारले असता हे चालणारच, असे उत्तर त्याने दिले. दरम्यानच्या काळात स्टार प्रवाहच्या मुंबई कार्यालयात फोन केला असता तेथे सुरक्षा रक्षकाने फोन उचलला. त्याने सांगितले की, रविवार असल्याने इकडे आग लागली तरी कुणी येणार नाही. स्टार प्रवाहच्या अधिकार्‍यांना मेल करून या गोंधळाचे फोटो आणि व्हिडिओ पाठवले; पण त्यांच्याकडून काहीच झाले नाही.