आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्टरलाइट'च्या व्यवस्थापकाला अटक, खाम नदीत रसायन सोडल्याचे प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाळूज येथील स्टरलाइट कंपनीचे व्यवस्थापक अमित रत्नपारखी यांना सोमवारी रात्री नऊ वाजता अटक करण्यात आली. खाम नदीत विषारी रसायने सोडण्याच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केली.

मागच्या आठवड्यात या प्रकरणाचा तपास वाळूज पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे तपासाची चक्रे वेगाने फिरवत सोमवारी रत्नपारखी यांची तास चौकशी करण्यात आली. कंपनीतील विषारी रसायने नष्ट करण्याची जबाबदारी रत्नपारखी यांच्यावर होती. कुठल्या कंपनीला कंत्राट द्यायचे याचे अधिकार त्यांना देण्यात आले होते. मागील पाच वर्षांपासून बंद असलेल्या कंपनीला त्यांनी कंत्राट दिले होते. रसायन नष्ट करण्यासाठी इंदूर, मुंबई येथे जाणे आवश्यक होते. या प्रवासाला किमान चार दिवस लागणे अपेक्षित असताना दोन दिवसांत टँकर परत येत होते. याविषयी त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. शिवाय टँकर जिल्ह्याबाहेर जाताना टोल नाक्यावर त्यांची नोंद झालेली नाही. त्यामुळे रत्नपारखी यांच्यावरील संशय बळावला आणि त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी पकडलेल्या सहा आरोपींशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला. त्यांच्यात काही अार्थिक व्यवहार होता का, याचा तपास सुरू आहे. याशिवाय या प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...