आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या आरोग्य केंद्रात गर्भपात केेंद्र तत्काळ सुरू करा, रहाटकर यांची प्रशासनाला सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मला प्रत्येकाकडे बोट दाखवायचे नाही, परंतु नाशिकचे उदाहरण असो वा औरंगाबादेतील; कुंपणच शेत खाताना दिसते. त्यामुळे आपले वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर नजर ठेवा. त्यांच्याकडून शपथपत्र घ्या. आपली यंत्रणा योग्य काम करते की नाही हे वेळोवेळी तपासा, अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पालिकेला केली. अवैध गर्भपात केंद्र निर्माण हाेऊ नयेत यासाठी मनपा अाराेग्य केंद्रात गर्भपात केंद्र सुरू करा अशी सूचनाही त्यांनी केली. 

जिन्सी येथील अवैध गर्भपात केंद्रप्रकरणी रहाटकर यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात महापौर भगवान घडमोडे, आयुक्त दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत अारोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात अवैध गर्भपात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली. 

या बैठकीस उपमहापौर स्मिता घोगरे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, शहर विकास आघाडीचे गटनेते गजानन बारवाल, सभागृह नेते गजानन मनगटे, भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, महिला बालकल्याण विभागाच्या सभापती अर्चना नीलकंठ, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेवक नितीन चित्ते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील स्त्री विभागाचे प्रमुख श्रीनिवास गडप्पा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी उपस्थित होते. 

रहाटकर काय म्हणाल्या?
जिन्सीयेथे अवैध गर्भपात सुरू होता, हे आपल्या कर्मचाऱ्यांना माहिती नाही, असे होऊ शकत नाही. पालिकेतील प्रत्येक आरोग्य केंद्रात गर्भपात केंद्राला मंजुरी देण्यात यावी, जेणेकरून अवैध केंद्रांकडे कोणी जाणार नाही. जिन्सी प्रकरणात ‘आशा’ वर्कर्सशी चर्चा करून अधिक माहिती मिळवा. पोलिसांप्रमाणे मनपानेही चौकशी करावी. आपल्या अधिकाऱ्यांकडून अवैध गर्भपात करत नाही, असे शपथपत्र घेण्यात यावे. त्यांची माहिती घेतली जावी. आरोग्य केंद्रात समुपदेशन केंद्र सुरू करावे.
 
कोणी मदत केली तो शोधा
अवैध गर्भपात करणाऱ्या चंद्रकला गायकवाडला मनपा यंत्रणेतून मदत होत होती, हे स्पष्ट आहे. निवृत्तीनंतर अवैध गर्भपातविरोधी पथकात ती तैनात झाली. त्यानंतर ती पालिकेच्याच कर्मचाऱ्याला मदतनीस म्हणून घेत होती. तिला कोण मदत करत होते, हे तपासलेच पाहिजे, असेही रहाटकर म्हणाल्या. 
 
रॅकेटचे धागेदोरे निसटले, गायकवाडला एमसीआर 
मागीलदोन वर्षापासून शहरातील जिन्सी परिसरातील रणमस्तपुऱ्यात अवैध गर्भपात केंद्र पोलिसांनी २४ मे रोजी उद््ध्वस्त केले. ते चालवणाऱ्या डॉ. चंद्रकला गायकवाड तीची मदतनीस शांता सातदिवे यांना अटक केली. त्यानंतर अवैध गर्भपाताचे रैकेट असल्याचे पोलिसांनी सांिगतले होते. मात्र, चार दिवसाच्या गायकवाडच्या पोलिस कोठडीत पोलिसांना तीचे रॅकेट उघडता आले नाहीच. सोमवारी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्या आता सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करू शकतात. 

या प्रकरणाचा तपास करणारे जिन्सी ठाण्याचे निरीक्षक श्यामसुदंर वसुरकर म्हणाले की, न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी तपास सुरू आहे. सोनोग्राफी सेंटरची यादी मनपाकडे मागितली आहे. काही डॉक्टारांचीही चौकशी केल्याचा दावा त्यांनी केला. घटनास्थळाचा पंचनामा करत तेथील डायरी जप्त केली आहे. त्यातून ठोस पुरावे मिळाले नसल्याचे उपायुक्त राहूल श्रीरामे म्हणाले. रोज चार ते पाच गर्भाची कत्तल करणाऱ्या डॉ. गायकवाड समोर आल्या मात्र त्यांच्या मागे असणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे पोलिसांना सापडले नाहीत. 

मनपात वैद्यकीय अधिकारीपदावरून निवृत्त झाल्यावर गायकवाड सोनाग्राफी सेंटर तपास पथकात होती. शासकीय यंत्रणेत राहून असा अवैध धंदा त्यांनी सुरू केल्यावर त्याची माहिती मनपात कोणालाच नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे पोलिसही तपासात कमी पडत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडील कामाचा व्याप पाहता हा तपास विशेष पथकाकडे देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही.

पोलिस तपासात प्रश्नाची उत्तरे हवी होती 
१.गायकवाडचे शहरातील किती डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटरशी सबंध होते. त्या माध्यमातून तिच्याकडे ग्राहक येत होते का ? 
२. गायकवाड मोबाईल डिटेल्स काय सांगतात.? त्यातून कोणावर संशय बळवला आहे का? 
३. अवैध रित्या गर्भलिंग निदान चाचणी करुन, स्त्री भ्रुण पाडला जात होता का ? 
बातम्या आणखी आहेत...