आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर औरंगाबाद-मुंबई बुलेट ट्रेन सुरू करा; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा टाेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बुलेट ट्रेनला आमचा विरोध नाही. मात्र, राज्य सरकार -केंद्र सरकारला बुलेट ट्रेनला रुपयाही खर्च करावा लागणार नाही, असे सुरुवातीला सांगितले जात असताना प्रत्यक्षात तब्बल  एक लाख २५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्याचा पैसा खर्च होणार असेल तर औरंगाबाद- मुंबई, जळगाव -मुंबई, सिंधुदुर्ग- मुंबई, नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन सुरू करा, अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्यापेक्षा भाजपचे स्वप्न होते, त्याचप्रमाणे दिल्ली -पाकव्याप्त काश्मीरपर्यंत बुलेट ट्रेन सुरू करा, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.  

राऊत म्हणाले की, ‘मराठवाड्यात निझामाच्या काळापासून एकही नवा रेल्वे रूळ टाकला नाही. मराठवाड्याला मुंबईचा कनेक्ट लवकर मिळाला पाहिजे. येथे हिरे व्यापारी नाहीत  किंवा अदानीही नाहीत म्हणून  मराठवाड्याला बुलेट ट्रेन देणार नाही का?   मुंबईच्या काही व्यापाऱ्यांना औरंगाबादमार्गे अहमदाबादला नेल्यामुळे मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून महाराष्ट्र लुटला जाणार आहे. शिवसेनेने सरसकट कर्जमाफीची मागणी केल्यानंतर अराजक माजेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी  नकारघंटा वाजवली. आता राज्य सरकार बुलेट ट्रेनसाठी पैसे देणार आहे. त्यामुळे अराजक माजणार नाही का?   पारिजातकाचा सडा पडणार आहे का?’ , असा सवालही त्यांनी केला. बुलेट ट्रेनचे केवळ १२ थांबे आहेत. त्यापैकी चार राज्यात आणि ०८ गुजरातमध्ये आहेत. याचा अर्थ महाराष्ट्र लुटण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? येथील शेतकऱ्यांनी समृद्धी व बुलेट ट्रेनसाठीही जमिनी द्यायच्या, मग शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही, असेही राऊत म्हणाले. 
 
लोडशेडिंगपेक्षा राजकारणाचीच चिंता   
कोळसा नसल्यामुळे राज्यात लोडशेडिंग करावे लागत आहे. हे सरकार केवळ २४ तास निवडणुका जिंकण्याच्या राजकारणाचाच विचार करत  आहे. लोक अंधारात राहिले तरी यांना (भाजपला) त्याची चिंता नाही. ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमाला नाशिकमध्ये चोरीची वीज वापरल्याची बातमी आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत भारनियमन हे एक कारण आहे. याविरोधात आवाज उठवत हेच राज्यकर्ते सत्तेत आले होते, मात्र त्यांना त्याचा विसर पडला आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...