आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइलच्या मदतीने आता खड्डे शोधणेही सहज शक्य; तरुण आयटी उद्योजकाचे स्टार्टअप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खड्ड्यांचे राज्य अशी ओळख असणाऱ्या राज्यात नेमके किती खड्डे आहेत हे मोजण्याची आधुनिक यंत्रणाच नाही. जे खड्डे बुजवल्याचा दावा केला जातोय, ते तपासण्याची सक्षम यंत्रणाही नाही. ही समस्या ओळखून औरंगाबादचा तरुण स्टार्टअप आयटी उद्योजक रणजित देशमुख यांनी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल पद्धतीने खड्डे शोधणारी यंत्रणा विकसित केली आहे. त्यांनी पावसाळ्यापूर्वी केलेल्या पाहणीतूनच राज्यातील खराब रस्त्यांची माहिती शासनाला समजली. त्यातील निष्कर्षांवर अंमलबजावणी केली तर खड्डे भरण्यासाठी शासनाचा होणारा तब्बल ६० टक्के खर्चही वाचू शकेल.  


खड्डे अचूकपणे शोधणारी कोणतीच ऑनलाइन यंत्रणा आजघडीला उपलब्ध नाही. ही बाब ओळखून देशमुख यांनी www.roadbounce.com ही ऑनलाइन यंत्रणा तयार केली आहे. या सुमारासच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने दोन वर्षांपूर्वी डिजिटल पद्धतीने खड्डे शोधण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यानंतर गेल्या वर्षी  देशमुख यांनी मंत्रालयात डिजिटल पद्धतीने खड्डे शोधण्याचे प्रेझेंटेशन दिले. शासनाच्या आदेशाने त्यांनी तब्बल २००० किलाेमीटर रस्त्यावर पायलट प्रोजेक्ट करून दाखवला. यानंतर शासनाने त्यांना खड्ड्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम दिले. त्यानुसार रोडबाउन्सने जानेवारी–फेब्रुवारी २०१७ दरम्यान रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ आदी १५ शहरांतील रस्त्यांतील २५ हजार किलाेमीटर रस्त्यावरील खड्डे त्यांनी अवघ्या २ महिन्यांत शोधले आहेत. याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केला आहे.  हैदराबाद महानगरपालिकेसाठीही ते काम करत आहेत.

 

साॅफ्टवेअरमध्ये ९० टक्के अचूकता

-  रोडबाउन्समध्ये सर्व काम ऑटोमॅटिक पद्धतीने होते. यासाठी एक व्यक्ती, एक कार आणि साधारणपणे ४०-५० हजार रुपयांचा उच्च प्रतीचा सेन्सर असणारा मोबाइल फोन लागतो. 

 

- मोबाइलमध्ये रोडबाउन्सचे साॅफ्टवेअर इन्स्टॉल केले जाते. जीपीएसद्वारे कारचा मार्ग  नोंदवला जातो.  कारला बसणारे कंपन नोंदवले जातेे. 

 

- दर १०० मीटरवर कंपनांची नोंद होऊन हा डेटा कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड हाेतो.  खड्डे अधिक आहेत तेथे गाडी अधिक कंपन पावते. हे खड्डे जीपीएस मार्गावर लाल रंगात दिसतात. 

 

- रोडबाउन्समुळे खड्ड्यांची ९० टक्क्यांपर्यंत अचूक आकडेवारी मिळते. मात्र, त्यासाठी वाहनाचा वेग ताशी ४० ते ६० किलोमीटर आवश्यक आहे. भुयारी मार्गात जीपीएस यंत्रणा बंद पडते. खूप वाहतुकीच्या भागातही वेग मंदावतो. अशा १० टक्के भागात अचूक प्रमाण मिळत नाही. 

 

शासनाची महागडी पद्धत
खड्डे शोधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते २०-२५ वर्षे जुनाट आणि महागड्या रफोमीटर, बम्प इंटिग्रेटरचा वापरते. एका गाडीत ही उपकरणे ठेवून एक कर्मचारी प्रत्येक बदलाची नोंद घेतो. नंतर त्या नोंदी संगणकात भरून कोणत्या मार्गावर किती खड्डे आहेत, हे शोधले जाते. हे यंत्र दर ३० हजार किलोमीटरनंतर दुरुस्तीसाठी दिल्लीला पाठवावे लागते. यात वेळ लागतो. शिवाय मॅन्युअली काम असल्याने चुका होण्याचा धाेका आहे. ठेकेदार खड्ड्यांच्या आकडेवारीत बदल करण्याची शक्यता असते.

 

६० टक्के पैशांची बचत
रोडबाउन्स खड्ड्यांची अचूक माहिती देत असल्याने ६० टक्के पैशाची बचत होते.  शिवाय दाट, सतत वाहतुकीची कोंडी होणारे रस्ते आणि अधिक खड्डे असणारे रस्ते याची अचूक माहिती मिळते. कंपनी ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊन हे खड्डे प्राथमिकतेने भरण्याचा सल्ला देते.यात मनुष्यबळाचीही बचत होते. 

 

अमेरिकन सेंटरमध्ये ऑफिस
अमेरिकन दूतावास, अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठ, भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागातर्फे नवी दिल्लीत नॅक्सस इन्क्युबेशन उपक्रम झाला. त्यात रोडबाउन्सची देशातील १२ उत्कृष्ट प्रोजेक्टमध्ये निवड झाली. तेथे दोन महिने काम केल्यानंतर  त्यांचा क्रमांक आता टॉप ४ प्रोजेक्टमध्ये आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...