आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य मंत्रिमंडळ ५, ६ रोजी औरंगाबादेत, मराठवाड्यात २००८ पासून मंत्रिमंडळाची बैठक नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादेत ५ आणि ६ ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाणार असून विभागीय आयुक्तांना त्याच्या तोंडी सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, लेखी पत्र लवकरच येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बैठकीचे सूतोवाच केले होते. पूर्वतयारीसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

२००८ नंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. बैठकीच्या नियोजनासाठी प्रशासनाच्या वतीने विविध समित्या, कक्षाची स्थापना झाली आहे. समन्वय कक्षप्रमुखपदी पी. एल. सोरमारे, अर्थ समिती निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, राजशिष्टाचार कक्षप्रमुखपदी संभाजी अडकुणे, वाहतूक व्यवस्था देवेंद्र कटके, निवास व्यवस्था केशव नेटके, भोजन व्यवस्था संजीव जाधवर, निवेदन स्वीकारणे नारायण उबाळे, माहिती संकलन कक्षप्रमुख संगीता सानप यांची नियुक्ती झाली आहे.

विभागीय आयुक्तालयाच्या विभाजनाचा अहवाल सादर
विभागीय आयुक्तालयाचे विभाजित मुख्यालय लातूर की नांदेडला करायचे याचा अहवाल मंगळवारी शासनाला सादर झाला. यात विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या एकसदस्यीय समितीने स्पष्ट मते नोंदवली आहेत. आधीच्या शासनाने मुख्यालय लातूरला नेण्याचा प्रस्ताव २००८ मध्ये मंजूर केला. २००९मध्ये पुन्हा नांदेडला मुख्यालय करण्याचा प्रस्ताव आला. समितीला मेमध्ये तीन महिने मुदतवाढ मिळाली. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीसाठी औरंगाबाद दूर पडत असल्याने विभाजनाचा प्रस्ताव आला होता. सर्व जिल्ह्यांच्या हरकती, सूचनांचा विचार झाला आहे.