आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायल धर्तीवर शेती करा,आत्महत्या रोखा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आपल्या देशात सरासरी ४५० ते एक हजार मिमीपर्यंत पाऊस पडतो. इस्रायलमध्ये केवळ १५० ते २०० मिमी पाऊस पडतो. त्यांच्या जमिनीचा पोत आपल्यासारखा दर्जेदार नाही, तरीही फळभाज्या, धान्य, दुग्धोत्पादनात तो देश अग्रेसर आहे. कारण तेथे वाफेच्या पाण्याचा उपयोग केला जातो. जे विकतं तेच पिकवलं जातं. उच्च तंत्रज्ञानाला प्राधान्य दिलं जातं. आमचे मंत्री, कृषी अधिकारी, शेतकरी तेथील तंत्रज्ञान बघून येतात; पण त्याचे अनुकरण होत नाही. इस्रायलच्या धर्तीवर शेती केली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असे आ. सुभाष झांबड यांनी सांगितले.
महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कलाग्राममध्ये आयोजित पाचदिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष पी. आर. शिंदे जिजाऊ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कृषी प्रदर्शनाचे उद््घाटन झाले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष विजय काकडे पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब आवारे, के. के. भुतेकर, किशोर बेदमुथा, महादेश देशमुख, गफ्फार पटेल, जयाजीराव देशमुख, उद्योजक अनिल देशमुख, तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे उपस्थित होते. आ. झांबड म्हणाले की, ज्या प्रमाणात उद्योगाला अनुदान, संरक्षण, बँक कर्ज आणि प्रोत्साहन दिले जाते, तेवढे शेतीला दिले गेले नाही. राज्यात सिंचन क्षेत्राच्या वाढीत मराठवाड्याला वंचित ठेवण्यात आले. शेतीमालाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. शेतमालाला भाव मिळावा यासाठी मी विधान परिषदेत आवाज उठवतोय. नदी, पाझर तलाव, बंधारे या कामांसाठी प्रस्ताव द्या, त्याला निधी उपलब्ध करून देतो, अशी ग्वाही आ. झांबड यांनी या वेळी दिली.

विभागीय आयुक्त आज करणार मार्गदर्शन
विभागीय आयुक्त उमाकांत दांगट हे कृषी क्षेत्रातील आव्हाने, तर शेतीनिष्ठ शेतकरी जगन्नाथ तायडे पाणलोट क्षेत्राचा विकास यावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात कुक्कुटपालन, पशुसंवर्धन, महिला बचत गट स्वयंरोजगार यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

प्रदर्शनास मिळतोय चांगला प्रतिसाद
प्रदर्शनात सिंचन तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण अवजारे, नवनवीन बी -बियाणे, शेततळ्यासाठी आवश्यक कापड, प्रक्रिया केलेल्या वस्तू, ज्यूस आदी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली उत्पादने, हर्बल वस्तू, औषधी वनस्पती, पुस्तके आदींचे स्टॉल्स आहेत. त्याला प्रतिसाद मिळत आहे.

कृत्रिम पावसाचा स्वतंत्र विभाग हवा
सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विदेशातून तंत्रज्ञान आणले. त्यावर २७ कोटी रुपये खर्च केले. त्याचा फायदा काय झाला? यापेक्षा आपल्या देशातच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा ठिकठिकाणी उभारावी. शेती क्षेत्रावर ७० टक्के खर्च करावा, अशी मागणी के. के. भुतेकर यांनी केली. उच्च तंत्रज्ञानाची शेतीला जोड देऊन फायद्याची शेती करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन विजय काकडे यांनी केले. जयाजी सूर्यवंशी यांनी, दुर्लक्षित पण बहुगुणी रामफळ, सीताफळ, बोर, जांभूळ ही कमी पाण्यात येणारी फळपिके कशी फायदा करून देत आहेत, याकडे लक्ष वेधले.