आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशनात अंधश्रद्धा निर्मुलन अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होणार - हर्षवर्धन पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर तातडीने अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याचा अध्यादेश शासनाने जारी केला. त्यावर येत्या नागपूर अधिवेशनात शिक्कामोर्तब करून कायद्यात रुपांतर केले जाणार आहे. या अधिवेशनात याच कायद्याला प्राधान्य असणार असल्याचे संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. पाटील आज औरंगाबाद दौ-यावर आहेत. यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन कायद्या संबंधीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले.

अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी सर्व संसदीय अयुधांचा वापर केला जणार असल्याचे पाटील म्हणाले. पाटील यांच्या उपस्थितीत सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यालाही ते उपस्थित राहिले.
राज्यात सहकार चळवळ मोठया प्रमाणात रुजली असून सहकार क्षेत्र अधिक मजबुत करण्यासाठी सहकारी संस्थांच्या सभासदांना व संबंधितांना सहकार क्षेत्राविषयी अधिक सखोल मार्गदर्शनासाठी अद्यावत राज्य शिखर प्रशिक्षण संस्था उभारण्यात येणार असल्याचे सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
येथील जगतगुरु संत तुकाराम महाराज नाटयमंदिर येथे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत औरंगाबाद व जालना जिल्हयातील सहकारी संस्थांच्या सभासदांना 97 व्या घटनादुरुस्तीनुसार सुधारित सहकार कायदयाची माहिती करुन देण्यासाठी सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, सहकार व पणन राज्यमंत्री सुरेश धस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शारदाताई जारवाल, जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आशाताई भुतेकर,आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड सहकार आयुक्त मधुकर चौधरी, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, अंकुशराव टोपे तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.