आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Level Medicine Storehouse Become In The Karmad

करमाडला राज्यस्तरीय औषधी भांडार हाेणार, प्रशिक्षण केंद्रही होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वारंवार भासणारा औषधींचा तुटवडा दूर करण्यासाठी लवकरच करमाडमध्ये राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात येणार आहे. येथे प्रशिक्षण केंद्रही सुरू होणार असून सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांना अद्ययावत वैद्यकीय उपचारांबाबत प्रशिक्षणही दिले जाईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. रविकिरण

चव्हाण यांनी दिली. २०११ च्या शासननिर्णयानुसार राज्यात मध्यवर्ती औषधी भांडार व वितरण केंद्र असावे हे निश्चित झाले होते. प्रत्येक कामासाठी पुणे-मुंबईवर महाराष्ट्र अवलंबून राहू नये. तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत हा यामागील उद्देश होता. औरंगाबादचे नाव यासाठी निश्चित झाले होते. आरोग्य उपसंचालक कार्यालयाने प्रस्ताव दिला होता. २४ एप्रिल २०१५ राेजी सार्वजनिक आरोग्य सचिव सुजाता सौनिक यांनी यासाठी जागा उपलब्ध करून

देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार नक्षत्रवाडीत जागा पाहण्यात आली. पण नो डेव्हलपमेंट झोनमुळे ही जागा देता येणार नाही, असे मनपाने सांगितले. यानंतर करमाडला २० एकर गायरान जमीन पाहण्यात आली आहे. या जागेची मोजणी झाली असून जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नगररचना विभागाचा अभिप्राय आणि जिल्हा परिषदेचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ही जागा आरक्षित होणार आहे. १३ व्या वित्त आयोगातून यासाठी १२ कोटींचा निधी आरक्षित करण्यात आला असून बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाल्यानंतर उच्चस्तरीय समितीमार्फत पदनिर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
सद्य:स्थिती अशी : जिल्हा रुग्णालये तसेच मनपाच्या दवाखान्यांसह घाटी रुग्णालयास यांना मुंबईत औषधांची मागणी नोंदवावी लागते. त्यानुसार कंपन्यांना ऑर्डर देऊन यानंतर औषधींचे वितरण होत असे. मात्र, यामुळे गरजेच्या वेळी किंवा नैसर्गिक आपत्तीप्रसंगी तसेच साथरोगांच्या काळात औषधी उपलब्ध होण्यास उशीर होत होता.

औरंगाबादची निवड : हे मध्यवर्ती शहर आहे. राष्ट्रीय तसेच राज्य मार्गांनी शहर जोडलेले आहे. इथून कुठल्याही ठिकाणी कमीत कमी वेळेत औषधी पोहोचवणे सहजशक्य आहे.
असा होईल फायदा : या औषधी भांडारामुळे शहरात औषधींचा तुटवडा जाणवणार नाही. अतिगरजेच्या सर्व औषधी तत्काळ उपलब्ध होतील. प्रशासकीय पदांखेरीज इतर रोजगारही उपलब्ध होईल. निकडीच्या वेळी तत्काळ औषधी पुरवणे शक्य व्हावे यासाठी हेलिकॉप्टरचा वापर होईल. त्यासाठी हेलिपॅडची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मंजुरीची प्रतीक्षा
माझ्या अखत्यारीतील सर्व कामे मी पूर्ण केली आहेत. ही जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव मंजूर होण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. ते झाल्यानंतर ही जागा लगेच उपलब्ध करून देता येईल.
- निधी पांडे, जिल्हाधिकारी

प्रस्ताव पाठवणार
ग्रामपंचायतीत ठराव मंजूर होणे गरजेचे आहे. दिवाळीपूर्वीच आम्ही तशा सूचना दिल्या होत्या. आता तो मंजूर झाला असल्यास आम्ही तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवणार आहोत. दिवाळीच्या सुट्यांमुळे थोडा विलंब झाला आहे.
अभिजित चौधरी, सीईओ, जिल्हा परिषद, औरंगाबाद