आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Secretary Of The Communist Party Of India Bhalchandra Kango In Aurangabad

तरुणांना कम्युनिझमकडे खेचण्याची गरज - डॉ. भालचंद्र कांगो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर बदलांचा अचूक वेध घेत चीनमधील कम्युनिस्ट पक्षाने अनेक बदल केले. तरुणाईच्या आशा-अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्याच धर्तीवर भारतातील तरुणांना कम्युनिझमकडे खेचण्यासाठी नव्या पद्धतीच्या प्रयत्नांची गरज असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ. भालचंद्र कांगो आणि आयटकचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बुद्धिनाथ बराळ यांनी व्यक्त केले.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या निमंत्रणावरून डॉ. कांगो यांच्या नेतृत्वातील पथक गेल्या महिन्यात चीन दौर्‍यावर गेले होते. तेथे होणार्‍या औद्योगिक प्रगतीचा, सामाजिक प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला. तर बराळ गेल्या 35 वर्षांपासून औरंगाबादेत डाव्यांच्या चळवळीचे अग्रणी आहेत. त्यामुळे चीनमधील बदल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष याविषयी संवाद साधण्याकरिता या दोघांना 11 ऑक्टोबरला ‘दिव्य मराठी’ कार्यालयात निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी संपादकीय सहकार्‍यांशी चर्चा करताना डॉ. कांगो म्हणाले, चीनमध्ये औद्योगिकीकरणावर भर दिला जात आहे. कारण, सोविएत युनियनच्या पडझडीतून धडा शिकत तेथे समाजवादाला भौतिक प्रगतीशी जोडण्यात आले आहे. भारतातही कम्युनिस्ट पक्षाला असा बदल करावा लागणार आहे.

विशेषत: तरुणांना नेमके काय वाटते, हे जाणून घेत त्यांना कम्युनिस्टांचे तत्त्वज्ञान नेमके काय आहे, हे समजावून सांगावे लागणार आहे. बराळ म्हणाले, जगात कोणाचेही शोषण होता कामा नये, एवढे साधे सरळ आणि लोकांचे हित जपणारे कम्युनिझमचे तत्त्वज्ञान आहे. मात्र, काहीजण विनाकारण या तत्त्वज्ञानाला बदनाम करत आहेत. धर्माच्या नावावर उन्माद वाढवून स्वत:ची राजकीय पोळी भाजली जात आहे. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी कम्युनिस्ट कधीच नाकारणार नाहीत. ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले.