औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पुणे येथील सीड इन्फोटेक कंपनीच्या वतीने राज्यभरात सीड आयटी आयडॉल स्पर्धा घेतली जाणार आहे. विद्यापीठ स्तरावर संगणकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती विद्यापीठाचे प्रसिद्धिप्रमुख संजय शिंदे, प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. गिरीश काळे सीड इन्फोटेक कंपनीच्या संचालिका भारती बऱ्हाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या सात वर्षांपासून राज्यस्तरावर ही स्पर्धा होत आहे. गेल्या वर्षी स्पर्धेत ६० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अभियांत्रिकी, एमसीएम, एमसीए, एमसीएस किंवा संगणकाशी संबंधित कोणताही अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी या स्पधेत सहभागी होऊ शकतात.
विविध महाविद्यालयांत नावनोंदणी सुरू आहे. स्पर्धेची पहिली फेरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल. स्पर्धेची दुसरी, तिसरी अंतिम फेरीनंतर विद्यापीठात बक्षीस वितरण होईल. या स्पर्धेत प्रथम सी प्रोग्रामिंग आणि कॉम्प्युटर फंडामेंटलवर आधारित ३० गुणांची परीक्षा घेतली जाते. त्यानंतर तीन फेऱ्यांतून अंतिम फेरीसाठी दहा विद्यार्थ्यांची निवड होते.
या स्पर्धेत ७० हजार विद्यार्थी सहभागी होतील, असा अंदाज आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यापीठ पीआरओ कार्यालय, प्लेसमेंट विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धा कोणासाठी?
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठातील संगणक विषयाशी निगडित अभियांत्रिकी, एमसीएम, एमसीए, एमसीएसचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.