आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वातंत्र्याचा खरा अर्थ समाजाला कळण्याची गरज’ उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंंद्र चपळगावकर यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- भारतीय लोकशाहीची स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ही तीन मूल्ये आहेत. मात्र सध्या समता आणि बंधुभाव या दोन्ही मूल्यांचा आढळ दुर्लभ झाला आहे. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य हे मूल्य रुजणार कसे? आज समाजाला खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ कळावा, अशी गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंंद्र चपळगावकर यांनी केले.
  
यंदाचा ‘परभणी भूषण’ हा पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, शाहीर प्रभाकर वाईकर यांना चपळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू होते.  पुरस्कार समितीचे निमंत्रक सदस्य देविदास कुलकर्णी, रमेशराव दुधाटे व डॉ. आसाराम लोमटे यांची उपस्थिती होती. वाईकर यांना अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन ‘परभणी भूषण’ पुरस्कार चपळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  चपळगावकर म्हणाले, सध्या कोणत्याही सर्जनशील लेखकाला चिंता वाटावी असा काळ निर्माण झाला आहे. आपल्या लेखनाने कोणाच्या भावना तर  दुखावणार नाहीत ना? असा विचार लेखकाला करावा लागत आहे.

विरोधातला विचार खपवूनच घ्यायचा नाही, असे मानणाऱ्या झुंडी आज चालून येत आहे. स्वतंत्रपणे विचार मांडणारांची सभाही चार-दोन लोक सहजपणे उधळून लावू शकतात. आपल्याला न पटणारा विचारही आपण ऐकून घेतला पाहिजे, त्याचे रीतसर मार्गाने खंडन केले पाहिजे, असे आता कोणालाच वाटत नाही. त्यामुळे संवादाची प्रक्रियाच समाजातून नष्ट झाली आहे. झुंडशाहीमुळे संवाद घडू दिला जात नाही, असेही ते म्हणाले. वाईकर यांनी ‘गांधीजी नाम अभी बाकी है, काम अभी बाकी है’ या पोवाड्याने सुरुवात करत सत्काराला उत्तर दिले. त्यांनी आपल्या स्वातंत्र्यसंग्रामातील काही आठवणींना उजाळा देताना स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याचे आवर्जून सांगितले. नव्या पिढीसमोर स्वातंत्र्याचा इतिहास आला पाहिजे यासाठी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास नव्याने विस्तृत स्वरूपात लिहिला जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी  सांगितले.   
 
बातम्या आणखी आहेत...