आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: गर्भारपणात मीडियापासून दूर राहावे : वैद्य वैदेही देवधर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्कॉनच्यावतीने रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित गर्भविज्ञान कार्यशाळेत सहभागी दांपत्य. - Divya Marathi
इस्कॉनच्यावतीने रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित गर्भविज्ञान कार्यशाळेत सहभागी दांपत्य.
औरंगाबाद: गर्भारपणात ज्या माता संस्कृत मंत्रोच्चार आणि पठण करतात त्यामुळे बाळाच्या मेंदूत आणि शरीरात अामूलाग्र बदल होतात. चित्रकला, मातीकला, भरतकाम आणि शास्त्रीय गायनाचाही बाळावर सकारात्मक परिणाम होतो.
 
या काळात मीडियापासून चार हात लांब रहा, असा सल्ला वैद्य वैदेही देवधर यांनी रविवारी(१८ जून) दिला. इस्कॉनच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित गर्भविज्ञान कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या वेळी डॉ. संजीवन देवधर यांनीही मार्गदर्शन केले. आजच्या युगात गर्भविज्ञानाची आवश्यकता लक्षात घेऊन गर्भाचे भाव आणि संस्कार या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 
 
वैदेही म्हणाल्या, तेजस्वी संतती प्राप्तीसाठी विविध उपाय भारतीय शास्त्राने सांगितले आहेत. त्याचे महत्त्व आता संपूर्ण जगाच्या वैज्ञानिक कसोटीवरही सिद्ध झाले आहे. गर्भावस्थेत आईचे स्वर मुलापर्यंत पोहाेचतात. याचा त्याच्यावर खोलवर परिणाम होतो. एक मुल आईच्या अंगाई गीतामुळे कोमातून बाहेर आल्याची घटना नुकतीच घडली आहे, त्याला हाच सिद्धांत लागू होतो. स्वरांच्या माध्यमातून आपण अधिक आकलन करत असतो. 
 
 
आईच्या वस्त्रांचा होतो परिणाम 
गर्भावस्थेत पांढरे तसेच फिकट रंगाचे वस्त्र महिलांनी परिधान करावेत. यामुळे बाळाची त्वचा चमकदार होते. तुकतुकीत कांतीचे हे एक रहस्य आहे. गडद रंगाचे कपडे या काळात कटाक्षाने टाळावेत. 
 
मुलांनासोबत घेऊन कला जोपासा 
गर्भावस्थेत चित्रकला, मातीकला, भरतकाम तसेच कुटप्रश्न सोडवणे अशा बाबी आवर्जून कराव्यात. ज्यांना मोठे मुल आहे, त्यांनी या मुलांना सोबत घेऊन कलाकुसर केल्यास पोटातील बाळ आणि मोठ्या मुलाचे एकमेकाशी समायोजन उत्तम होते. 
 
मनातील भीती दूर करा - डॉ. संजीवन 
निसर्गातील प्रत्येक सजीव पुनरुत्पत्तीच्या प्रक्रियेतून जातो. ही प्रक्रिया आयुष्यात अनंत काळ टिकणारा आनंद भरते. महिला गर्भावस्थेत किंवा त्याआधी वारंवार इतरांना झालेल्या त्रासाच्या रंजक कहाण्या ऐकतात. याचा त्यांच्यावर गंभीर परिणाम होतो. सिझेरियन बाळंतपणाचे हे एक प्रमुख कारण आहे. महिलांनी सुरुवातीपासून नैसर्गिक प्रसूतीची मानसिकता तयार करणे आणि त्यासाठी प्रत्येक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सूर्यनमस्कार, तुलसी जलअर्पण, प्रदक्षिणा, वृक्षारोपण आणि संवर्धन, पुष्पसाधना, पक्ष्यांना दानापाणी घालणे आणि दान करणे या क्रिया शरीर आणि मनावर उत्तम परिणाम करतात. श्रेष्ठ संततीसाठी जाणीवपूर्वक या गोष्टी करणाऱ्यांना उत्तम परिणाम दिसून येतात, हे सिद्ध झाले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...