आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Still So Many Voter Not Register For Upcoming Election

अनागोंदी - शहर व जिल्ह्यातील हजारो मतदार नोंदणीपासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील ९ मतदारसंघांत अनेकजण मतदानापासून वंचित राहणार आहेत. दर रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी, पत्त्यातील, नावातील बदल आदी कामे केले जातील, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात रविवारी मात्र शहर, जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिमुळे नागरिकांना नावनोंदणी करता आली नाही.

सातारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सोमनाथ शिराणे म्हणाले, रविवारी सकाळपासून नागरिकांनी जि.प. शाळेत नावनोंदणीसाठी गर्दी केली. मात्र, तेथे अधिकारी नव्हते. सातारा-देवळाई नगर परिषदेचे प्रशासक विजय राऊत यांना विचारले असता मागील रविवारपर्यंतच नोंदणी सुरू होती. आता तहसील कार्यालयात नोंदणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सेडिकोतील अभिषेक नातू १४ सप्टेंबरला वेणूताई चव्हाण शाळेत गेले होते. मात्र, कोणीही अधिकारी तेथे नव्हता. तेथे विचारले असता दोन आठवड्यांपासून कोणीही आले
नसल्याचे सांगण्यात आले.

तहसील कार्यालयात नोंदणी सुरू : आतापर्यंत विविध राजकीय पक्ष शिबिरे भरवून नागरिकांचे फॉर्म एकत्रित करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवत; पण आता नावनोंदणीसाठी प्रत्यक्ष मतदारालाच उपस्थित राहावे लागते. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील तहसील कार्यालयात नोंदणी सुरू असल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.

अग्रवाल युवा मंचची "कोशीश' : अग्रवाल युवा मंचतर्फे १४ सप्टेंबरला "कोशीश' उपक्रम राबवण्यात आला. यात विविध ओळखपत्रांसाठी नावनोंदणी करण्यात आली. अग्रवाल समाजातील १२२ तरुणांनी मतदान ओळखपत्रासाठी अर्ज केले. अग्रेसन भवन येथे एकाच छताखाली मतदान, आधार, पासपोर्ट, राष्ट्रीयीकृत बँक खाते व पॅनकार्ड काढण्यात आले. अग्रवाल सभेचे अध्यक्ष डॉ. मनोहर अग्रवाल यांच्या हस्ते या शिबिराचे उद््घाटन झाले. आशिष अग्रवाल, नवनीत भरतिया, शैलेश अग्रवाल, गिरीश अग्रवाल, अलकेश अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.
लोकसभेपेक्षा विधानसभेला ६४ हजार मतदार वाढले

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- वीज बिल, टेलिफोन बिल, टॅक्स पावती किंवा रेशन कार्ड
- वयाच्या दाखल्यासाठी टी.सी. किंवा जन्माचा दाखला, आई-वडिलांचे मतदान कार्ड
- एक पोसपोर्ट साइज फोटो, विवाहित अर्जदारासाठी विवाह प्रमाणपत्र किंवा लग्नाची पत्रिका

महिला मागेच
लोकसंख्येच्या जनगणनेनुसार प्रत्येक हजार मतदारांमागे ९२३ महिला मतदार यादीत असणे क्रमप्राप्त आहे. मात्र, जिल्ह्यात हे प्रमाण सरासरी ८७२ इतके आहे. याचा अर्थ गायब नावांमध्ये महिलांचीच संख्या जास्त आहे. मध्य मतदारसंघात महिलांचे प्रमाण सर्वाधिक ९१३, तर सिल्लोडमध्ये सर्वाधिक म्हणजे ८५१ इतके आहे. नव्याने झालेल्या नोंदीत ३३ हजार ३८ पुरुष, तर ३० हजार ७६४ महिलांची मतदार म्हणून नोंद झाली.

५० हजार यादीबाहेर
लोकसंख्येच्या तुलनेत ६२.६४ टक्के नागरिक हे वयाच्या १८ वर्षांवरील म्हणजेच मतदार असतात. जिल्ह्यात हे प्रमाण ६१.२० इतके आहे. जवळपास एक टक्का म्हणजेच ५० हजारांवर नागरिक अजूनही मतदार यादीत नाहीत. येत्या १७ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार असून यातील जास्तीत जास्त नागरिकांचे नाव यादीत येईल यासाठी प्रयत्न केले जातील.

जिल्ह्यात २४ लाख ४७ हजार मतदार
लोकसभा निवडणुकीसाठी २३ लाख ८३ हजार ७५८ मतदार होते. ३० जुलैला झालेल्या नोंदणीनुसार ते आता २४ लाख ४७ हजार ५६० इतके झाले आहेत. त्यानंतरच्या दीड महिन्यात त्यात ४० हजारांची वाढ झाल्याचे आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. महिलांचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच राहिले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अजूनही ७० हजार नागरिक यादीत येऊ शकले नाहीत.