आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Still Time Hasn't Gone ; Learn From Drought : Popat Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजूनही वेळ गेलेली नाही; दुष्काळापासून बोध घ्या : पोपट पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दुष्काळाचे संकट मोठे आहे. दुष्काळाला नियोजनाच्या माध्यमातून सामोरे जाता येते. हतबल होऊ नका, भीती बाळगू नका, दुष्काळापासून बोध घ्या. लोकप्रतिनिधी, अधिकारी व जनता एकत्र आल्यास सारे शक्य आहे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.

जागतिक जलदिनानिमित्त क्रेडाईच्या वतीने सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात शुक्रवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जल आयोगाचे अध्यक्ष डॉ. माधवराव चितळे यांनी केले. अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत खैरे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, आधीचे मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, क्रेडाईचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, राजेंद्रसिंग जबिंदा आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी खैरनार यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. सुशील भारुका यांनी जलदिनाविषयीच्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

पाणी जपून वापरा : जिल्हाधिकारी विक्रमकुमार म्हणाले की, पाण्याचे महत्त्व मला इथे आल्यावर कळले. आज जिल्ह्यातील 330 गावांतील पाण्याचे स्रोत आटले आहेत. विहिरी, पाझर तलाव सारे कोरडे पडले आहेत. टँकर भरण्याचे स्रोतही संपत आले आहेत. हे कठीण वर्ष आहे. पाणी जपून वापरले नाही, पाणी वाचवले नाही हेच या स्थितीमागचे खरे कारण आहे. आज रोज पाणी कमी होत आहे. एका अभ्यासानुसार 2025 मध्ये उपलब्ध पाणी आणि गरज यात 40 टक्क्यांची तफावत असणार आहे. त्यामुळे पाण्याचा जपून आणि काळजीपूर्वक वापर केला गेला पाहिजे.


गणित गडबडले : मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले की, सध्या शहराला आपण तीन दिवसांनी पाणी देतो. पण पुढचे काही सांगता येत नाही. पाण्याबाबत जागरूकता निर्माण व्हायला हवी. पाणी हे जीवन आहे. जगात सर्व संस्कृती पाण्याजवळच निर्माण झाल्या, पण आता पाणी आणि अर्थशास्त्राचे गणित गडबडले आहे. जास्त पाणी लागणार्‍या ऊस, केळी अशा पिकांचे उत्पादन केले जाते. त्यातून पाण्याचा अमाप वापर होतो आहे.

नागरिकांचीही जबाबदारी : महापौर कला ओझा म्हणाल्या की, महापालिका पाणी देत नाही अशी ओरड होते. पण पाणी जपून वापरण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. मात्र, ते होताना दिसत नाही. दुष्काळापुरते पाण्याबाबत जागे न होता नेहमीच पाण्याचा जपून वापर करायला हवा. पाण्याचा उपसा किती केला जातो याची जाणीव नसल्याचे दिसते. रेन वॉटर हार्वेस्टिंग केले तर पाण्याची पातळी निश्चितच वाढणार आहे.

पाण्याचा प्रश्न सोडवू : खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, पुढील काळात पाण्यावरून दंगली होतील, असे चित्र आहे. दुष्काळ ही निसर्गाची अवकृपा असली तरी त्यात आपलाही दोष आहेच. पाण्याचे नियोजन करून वापर होत नसल्याने टंचाईचे संकट गंभीर बनले आहे. सरकारने चांगल्या योजना हाती घेतल्या. केंद्राच्या पैशातून योजना येतात, पण त्याची खालच्या पातळीवर अंमलबजावणी होत नाही. भ्रष्टाचार होतो. औरंगाबादच्या समांतर जलवाहिनीवरून वादंग निर्माण केले जात आहेत. पण शहराच्या लोकसंख्येला पुरेसे पाणी मिळावे यासाठी ही योजना आहे. मनपाकडे पैसा नसताना हे काम करून घ्यावे लागणार आहे.

पंचधारांचा वापर करा : जल आयोगाचे अध्यक्ष डॉ. माधवराव चितळे म्हणाले की, पाण्यासारख्या विषयावर ऐकण्यासाठी आज जो लोकांचा प्रतिसाद मिळाला तो पाहता चित्र निश्चित बदलणार असल्याचा हा संकेत आहे. पण त्यासाठी आधी समाजाची मानसिकता बदलायला हवी. ते काम सुरू झाले आहे. कुठलेही विकासाचे काम यशस्वी करायचे असेल तर शासकीय, खासगी, शैक्षणिक, स्वैच्छिक आणि सामाजिक या पंचधारांचा वापर करायला हवा.

आपण शासकीय आणि शैक्षणिक या दोन धारांकडेच लक्ष देत असतो. पण सर्वांचा वापर केला तर हमखास यश मिळते. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यात स6ुसंवाद निर्माण झाला तर आपल्याला ध्येयाकडे वाटचाल करता येईल.


गरज मानसिकता बदलण्याची
पोपटराव पवार म्हणाले, मी रोज तुमच्या डोळ्यातील पाणी पाहतो. 1972 च्या दुष्काळाने गावांचे गावपण गेले, 2013 चा दुष्काळ उद्याचे भविष्य अंधारात नेईल का, अशी भीती आहे; पण या संकटाचा मुकाबला केलाच पाहिजे. त्यासाठी पैशापेक्षा मानसिकता आणि नीतिमूल्यांच्या आधारावर पावले उचलायला हवीत. दुष्काळ ही संधी आहे, असे म्हणतात; पण ती संधी कंत्राटदार, टँकर, चारा पुरवणार्‍यांसाठी आहे की जलसंधारणाचे काम करणार्‍यांसाठी, हे ठरवायची ही वेळ आहे. शहरातील लोकांनी पाणी वाचवायला, तर गावातल्या लोकांनी पाणी जिरवायला शिकावे. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि जनता यांनी एकत्र येत दुष्काळाचा मुकाबला करायला हवा. दुष्काळाला नियोजनाच्या माध्यमातून सामोरे जाता येते. हतबल होऊ नका, भीती बाळगू नका. सरकारमध्येही अनेक अधिकारी मंत्रालयात वेटिंगवर आहेत. त्यांना पोस्टिंग नाही. अशा अधिकार्‍यांचा एक फोर्स तयार करून तातडीने पावले उचलली तर सारे शक्य आहे.