आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sting Operation : Ghati's Doctors Keeping Privat Practice

आरोग्याचा पंचनामा : परवानगी नसतानाही घाटीतील डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करू नये म्हणून दिला जाणारा 35 टक्के व्यवसायरोध भत्ता (नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स) गिळंकृत करूनही बाहेर खासगी प्रॅक्ट्रिस करणार्‍या किमान 25 वरिष्ठ-कनिष्ठ डॉक्टरांना सातत्याने अभय मिळत आहे. घाटीचे ‘धन’ आणि खासगीत ‘तन-मन’ अशी अवस्था असल्याने रुग्णसेवेला फार मोठा फटका बसत आहे.

विशेष म्हणजे या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून चौकशी समिती नेमण्यात येऊनही खासगी प्रॅक्टिस काही केल्या बंद होताना दिसत नाही. त्याचा थेट परिणाम म्हणजे ओपीडीची वेळ संपल्यानंतर म्हणजेच दुपारी साडेबारानंतर फार कमी वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयात असतात. दुपार-संध्याकाळचा राउंडच होत नाही. रात्रीही अगदी तुरळक वरिष्ठ डॉक्टर असतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे निवासी डॉक्टरांच्या (रेसिडेंट) भरवशावरच संपूर्ण अपघात विभाग (कॅज्युअल्टी) चालतो आणि रात्री तर वरिष्ठ अभावानेच असतात. सर्व काही उपचार फोनवर होतात. वेळ पडली तर अमुक एका रुग्णावर तमुक उपचार करावेत, असे पथकप्रमुख, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता रेसिडेंटला (निवासी डॉक्टरला) सांगून मोकळे होतात.

कॅज्युअल्टीत सबकुछ ‘रामभरोसे’

‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला काही दिवसांपूर्वी रात्री आठ ते दहा या वेळेत अपघात विभागात आलेला अनुभव असा : त्या वेळी एकही अधिव्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक नव्हते. दर पाच-दहा मिनिटांनी रुग्ण दाखल होत होते. मोठय़ा प्रमाणावर रुग्णसंख्या असूनही नियंत्रण-समन्वय साधण्यासाठी एकही वरिष्ठ डॉक्टर नसल्याने गोंधळाची स्थिती होती. एका ज्येष्ठ व्यक्तीला विहिरीत पडून डोक्याला गंभीर मार लागला होता. त्याचे सीटी स्कॅन करण्यास सांगण्यात आले होते; पण एक तासापासून त्यांना स्ट्रेचर मिळत नव्हते. सीएमओ डॉ. माने यांना वारंवार मागणी करूनही स्ट्रेचर मिळत नव्हते. ज्येष्ठ नातेवाइकांशी डॉक्टरांनी वादावादी केली. शेवटी प्रतिनिधीने हस्तक्षेप केल्यानंतर स्ट्रेचर मिळाले. इतर रुग्णांच्याही तक्रारी सुरू होत्या.


‘त्यांच्या’ नावाने भरचौकात लॅब

चेतक घोडा चौकात एका वरिष्ठ व नावाजलेल्या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरचे आडनाव रुग्णालयाला असून, तिथे सर्रास लॅब सुरू आहे. त्यांच्यासोबत त्यांच्याच विभागातील एक जण कार्यरत आहे, हेही विशेष! घाटीच्या अस्थिव्यंग विभागातील चार डॉक्टर खुलेआम प्रॅक्टिस करीत आहेत. त्यातील एका डॉक्टरच्या आडनावाने समतानगरात अँक्सिडेंट हॉस्पिटल आहे. शल्यचिकित्सा विभागातील पाच डॉक्टरपैकी एक जण एकाच वेळी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये कार्यरत आहे. कधी या रुग्णालयात, तर कधी दुसर्‍या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा दिवस निघून जातो. एक ‘युरोलॉजिस्ट’ विविध रुग्णालयांत शस्त्रक्रिया करतात. औषधवैद्यकशास्त्र विभागातील एक, क्ष-किरण विभागातील दोघे तसेच नेत्र विभागातील एक, रेडिओथेरपी विभागातील एक, स्त्रीरोग व प्रसूती विभागातील तीन डॉक्टरही उजळमाथ्याने प्रॅक्टिस करीत आहेत. बधिरीकरणशास्त्र विभागातील एक तरुण डॉक्टर कधीही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हमखास दिसतात. हेच डॉक्टर ‘पेन मॅनेजमेंट’च्या एका खासगी ग्रुपमध्ये सहभागी आहेत. प्रशासकीय पदावर असलेले एक अधिकारीही छावणीत प्रॅक्टिस करतात.