आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटपूंज्या मानधनात कपात, पहिलवानांची थट्टा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहराला कुस्तीची मोठी परंपरा होती, पण सरकारी उदासीनतेमुळे या खेळात झोकून देण्याची वृत्ती संपली आहे. जिल्हास्तरीय चाचणीत निवड झालेल्या पहिलवानांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी शासन खुराक म्हणून दरमहा 100 आणि 200 रुपये मानधन देते. या मानधनात स्पर्धेसाठी जाण्या-येण्याच्या खर्चाचाही समावेश आहे. मागील वर्षापर्यंत मातीवर कुस्ती खेळणार्‍यांना दरवर्षी 1200, तर गादीवर कुस्ती खेळणार्‍या पहिलवानाला 2400 रुपये मदत मिळायची. यावर्षी यात कपात झाली. आता 800 ते 1800 रुपये मानधन मिळत आहे.

कागदावरची योजना
कुठल्याही खेळात सुवर्ण, कांस्य किंवा रौप्य पदक मिळवणार्‍यास शासन शासकीय नोकरीत 5 टक्के आरक्षण देते. तसेच 10 किंवा 12 वीमध्ये नापास झालेल्या खेळाडूंना 25 गुणांचा लाभ होतो. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत यश मिळाल्यानंतर शासनाने प्रत्येक जिल्ह्याला क्रीडांगण देण्याची घोषणा केली आहे. यात 10 हजार लोकवस्ती असलेल्या गावांचा समावेश आहे. येथे काम करणारा क्रीडाश्रीयास 500 रुपये मानधन देण्यात येते व 1 लाखांची मदत करण्यात येते. सध्या तरी ही योजना कागदावरच तयार केली जात आहे.


स्वबळावर श्रीहनुमान व्यायामशाळा
10 ऑक्टोबर 1984 मध्ये तत्कालीन राज्यमंत्री अब्दुल अजीम यांच्या हस्ते बेगमपुरा येथील ब्राrाण गल्लीतील श्रीहनुमान व्यायामशाळेचे उद्घाटन झाले होते. या व्यायामशाळेचे पहिले उस्ताद म्हणून कुंदनलालजी डोंगरे प्रसिद्ध होते. कुस्तीची परंपरा सुरू केल्यानंतर या व्यायामशाळेतून अजबसिंग जारवाल (गोल्ड मेडल), मंगेश डोंगरे हे राष्ट्रीय कुस्ती कोच म्हणून गाजले. सुरुवातीला या व्यायामशाळेत सकाळपासून कसरत करण्यासाठी 50 ते 60 पहिलवानांचा ताफा येत होता, परंतु सुविधेअभावी येथे आजघडीला केवळ 20 ते 25 तरुण हजेरी लावत असल्याचे व्यायामशाळेची देखरेख करणारे व तरुण पहिलवान गोपाळ जिरे यांनी सांगितले. मातीतील कुस्ती आता मॅटवर आल्याने कुस्तीचे स्वरूपही बदलले आहे. वाडवडिलांची परंपरा जपण्यासाठी ब्राrाण गल्लीतील पहिलवान शासकीय मदतीची वाट न पाहता रोज कसरत करीत आहेत. आपल्या जिद्दीवर येथील सौरभ राऊत, नीलेश दसपुते, करण राजपूत या मुलांनी महाराष्ट्र शालेय राज्यस्तरीय स्पध्रेत यश मिळवत सुवर्ण व कांस्य पदक पटकावले आहे. याच ठिकाणी अद्ययावत सुविधा दिल्यास येथील मुले नक्कीच आंतरराष्ट्रीय स्पध्रेत यश मिळवतील, असा विश्वास व्यायामशाळेतील खेळाडू करण संतय बरेटिये याला वाटतो.


रतिरामजी बसैये व्यायामशाळा बंद
औरंगपुरा येथे 50 वर्षांपासून ही व्यायामशाळा सुरू आहे. पूर्वी येथे बेगमपुरा, छावणी येथून करसत करण्यासाठी अनेक पहिलवान येत होते. काळाच्या ओघात आणि सुविधेअभावी इकडे आता पहिलवान फिरकतही नाहीत. गेल्या 15 वर्षांपासून ही व्यायामशाळा बंद आहे.


तरुणांचा कल कमी
आमची व्यायामशाळा परंपरागत आहे. शासनाच्या धोरणामुळे आता तरुण मंडळी आखाड्यात नव्हे, तर जिम्नॅस्टिकच्या मागे लागली आहे. ओमप्रकाश बसैये बंधू, आखाडाप्रमुख


एका कुस्तीपटूची धडपड
शहरात बेगमपुरा आणि हसरूल येथे कुस्तीची परंपरा जपण्याची धडपड काही तरुण मंडळी करीत आहे. हसरूल येथे पटेल मुख्तार रतन या नॅशनल कोच असलेल्या कुस्तीपटूने अत्याधुनिक एकता नावाची व्यायामशाळा 15 लाख रुपये खर्च करून उभारली आहे. या ठिकाणी 80 पहिलवान रोज कसरत करीत महाराष्ट्रातील विविध स्पर्धांत आपल्या यशाचा झेंडा फडकावत आहेत. पटेल यांच्या धडपडीने कुस्तीची परंपरा चांगल्या पद्धतीने जपली जात आहे. पटेल यांनी कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून पहिलवानांना बक्षीस स्वरूपात 2 लाखांची मदतही केली आहे.


सुविधेअभावी आखाड्यांना घरघर
शहराला कुस्तीची मोठी परंपरा होती. बेगमपुरा, औरंगपुरा, चेलिपुरा, धावणी मोहल्ला, पडेगाव,जटवाडा, नायगाव, ओहर, पळशी, छावणी आणि हर्सूल हे भाग तेथील आखाडे आणि पहिलवानांच्या नावाने ओळखले जायचे. या सर्व भागात छोटे-मोठे मिळून साधारण 15 च्या आसपास आखाडे होते. त्यातील दोन बर्‍यापैकी सुरू आहेत. उर्वरित सुविधेअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांना एकप्रकारे घरघरच लागली असे म्हणता येईल.


सुविधांचा अभाव
व्यायामशाळेत सुविधा नाहीत. अनेक वेळा हा प्रश्न पुढारी, प्रशासनासमोर मांडला. यावर वेळोवेळी बैठका झाल्या. मात्र, केवळ आश्वासने मिळतात. उस्ताद डॉ. प्रा. हंसराज डोंगरे हे स्वत: खर्च करून व्यायामशाळा चालवत आहेत. सुविधेअभावी तरुणांची संख्या कमी झाली आहे. गोपाळ जिरे, पहिलवान, हनुमार व्यायामशाळा, बेगमपुरा