आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत हिरे म्हणून दगड माथी मारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यांना गंडवण्याचे प्रकार आता सर्रास सुरू आहेत. ऑनलाइन शॉपिंगही त्याचाच एक भाग. यात काही चांगल्या साइट आहेत, तर अनेक बोगस साइटवर लोकांची फसवणूक होते. थेट उत्पादकांकडून मोठय़ा प्रमाणात माल घेतल्यामुळे तो स्वस्तात पडतो, तर स्टॉकिस्ट, डीलर, रिटेलर, वाहतूक अशा बाबी नसल्यामुळे पैशांची बचत होते. यामुळेच या वस्तू स्वस्तात विकत असल्याचा दावा या वेबसाइट करत असतात. तशा जाहिरातीही केल्या जातात. यास भुरळून सर्वसामान्य नागरिक त्यांची खरेदी करतो आणि तोंडघशी पडतो. असेच प्रकार एका मोठय़ा समूहाच्या या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर घडत आहेत.

असा गठला ग्राहक
एका कारच्या शोरूममध्ये नोकरी करणारे मुकेश चौहान यांनी जून महिन्यात या पोर्टलवर 599 रुपयांत लॅपटॉप बॅग विकत घेतली. याचे पेमेंट क्रेडिट कार्डाने केले. बॅग घरी येण्यापूर्वीच त्यांना याच कंपनीतून 47 हजार 337 रुपयांच्या वस्तू 12 हजार 999 रुपयांत विकत देत असल्याचा फोन आला. मुकेश यांनी इंटरेस्ट नसल्याचे सांगून नकार दिला. मात्र, सतत फोन आल्यामुळे त्यांनी याबाबतचा ई-मेल करण्यास सांगितले. त्यानुसार 8 जुलै रोजी मुकेश यांना कंपनीने मेल पाठवला आणि त्यात वस्तूंची माहिती दिली.

टॅब्लेट, हिरे आणि बरेच काही
या मेलमध्ये पोर्टलने व्हॉक्स कंपनीचा 5 हजार 499 रुपयांचा टॅब्लेट, मॅक्झिमाच्या 3 हजार 999 रुपयांच्या दोन घड्याळी आणि 30 हजार रुपयांच्या हिर्‍यांसह एकूण 6 वस्तूंची यादी पाठवली. यांची किंमत 47 हजार 337 एवढी होती. यावर 73 टक्के सूट असल्याचे सांगून त्या केवळ 12 हजार 999 मध्ये मिळणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावर मुकेश यांचे तब्बल 34 हजार 338 रुपये वाचणार होते.


असा बसला पहिला धक्का
डील फायनल झाल्यावर त्यांनी संध्याकाळी एसबीआय क्रेडिट कार्डच्या हेल्पलाइनवर फोन केला आणि त्यांच्या खात्यात हप्ते पडले आहेत का? अशी विचारणा केली. त्यांनी नाही सांगितल्यानंतर चौहान यांनी पुन्हा एकदा पोर्टलला फोन करून हप्ते का नाही पाडले, याची विचारणा केली. मात्र, हेल्पलाइनवरील व्यक्तीने हप्ते पाडणे हे आमचे काम नसल्याचे सांगून वेळ मारून नेली. यामुळे संतप्त होऊन त्यांनी ही ऑर्डर रद्द करण्यास सांगितले. तसा मेलही केला.


ऑर्डर रद्द करणे अशक्य
दुसर्‍या दिवशी त्यांना कंपनीने फोन करून त्यांचे नाव अँपल डेटा बेस नावाच्या स्पध्रेत टाकल्याची माहिती दिली. याचा निकाल लवकरच असल्याने डील रद्द करणे शक्य नसल्याचे त्यांना एक्झिक्युटिव्हने सांगितले. यानंतर त्यांना अनेक लोकांनी फोन करून ऑर्डर रद्द करू नका, अशी गळ घातली.


हिरे विकण्याचे आश्वासन
केवळ हप्ते न पाडल्यामुळे ही ऑर्डर रद्द करण्यापेक्षा त्यावर एक उपाय रोहन नावाच्या एक्झिक्युटिव्हने सांगितला. त्याने ऑर्डरमधील 30 हजार रुपयांचे हिरे त्यांना विकून देण्याचे आश्वासन दिले. कशाही स्थितीत ही डील फायद्याची राहील, असे तो म्हणाला. चौहान यांनी होकार दिल्यावर पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन कॉल आला आणि ऑर्डर नक्की झाली.

दुसरा धक्का
या ऑर्डरमधील वस्तू 4 जुलै रोजी त्यांच्या घरी आल्या. आता त्यांना दुसरा धक्का बसला. यातील टॅब्लेट खराब होता. खूप प्रयत्न करूनही तो सुरू झालाच नाही. इतर वस्तूही जेमतेमच होत्या.


..आणि तिसरा धक्का
टॅब्लेट खराब निघाल्याचे लक्षात येताच त्यांनी हिरे विकण्यासाठी पोर्टलच्या रोहनला कॉल केला. मात्र, या ऑफिसमध्ये या नावाचा कोणीच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. या प्रकाराचा शेवटचा अंक अजून बाकी होता. आता आपण स्वत: हे हिरे विकावे या उद्देशाने चौहान यांनी शहरातील प्रतिष्ठित लालचंद मंगलदास सोनी यांना हे हिरे दाखवले. त्यांनी हिर्‍यांची सखोल तपासणी करून ते खोटे असल्याचे सांगितले. या हिर्‍यांची किंमत 3 ते 4 हजार रुपयांच्या वर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण या प्रकारात लुबाडलो गेलो आहे, हे चौहान यांच्या लक्षात आले.


कंपनीची चालढकल
यानंतर चौहान यांनी कंपनीला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली, पण त्यांना कोणीच समाधानकारक उत्तर दिले नाही. प्रत्येक जण चालढकल करत गेला. एकदा माल विकल्यानंतर त्याची जबाबदारी आमची राहत नाही, असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. यामुळे पैसे तर गेलेच शिवाय दुय्यम दर्जाच्या वस्तू मिळाल्याचा पश्चात्ताप त्यांना होत आहे.

नाव मोठे म्हणून.. ही कंपनी एका मोठय़ा समूहाची वेबसाइट आहे. येथे खरेदी करणे सुरक्षित असेल, असे त्यांना वाटले. यामुळे मुकेश यांनी होकार दिला. मात्र, हे करत असतानाच त्यांनी 12 हजार 999 ही रक्कम सुलभ हप्त्यात भरण्याची सोय द्यावी, अशी विनंती कंपनीला केली. त्यांनी ती मान्य केली. त्यानुसार त्यांच्या क्रेडिट कार्डावरून दरमहा ही रक्कम कापली जाणार होती.

कंपनीचा बोलण्यास नकार
याबाबत कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी डीबी स्टारने कंपनीचे सीनिअर सेल्स ऑफिसरला मेल केला. कंपनीच्या हेल्पलाइनवरही संपर्क साधला. कंपनीने मेलचे उत्तर दिले नाही, तर हेल्पलाइनच्या एक्झिक्युटिव्हने वरिष्ठांचा क्रमांक देण्यास नकार दिला.


कंपनीवर कारवाई करा
माझी फसवणूक झाली. आता कंपनी माझे फोन घेत नाही किंवा मदतही करत नाही. या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे.
मुकेश चौहान,त्रस्त ग्राहक


हे हिरे खोटे
चौहान यांना पाठवण्यात आलेले हिरे खोटे आहेत. त्यांची किंमत 3 ते 4 हजार रुपये आहे. उदय सोनी, एलएमएस जेम्स अँड ज्वेलर्स