औरंगाबाद - भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांच्या गारखेडा परिसरातील संपर्क कार्यालयावर बुधवारी सायंकाळी ६.३०च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली. घटनेनंतर दानवे यांच्या कार्यालयावर कडक पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना बुधवारी मुंबई येथील राजभवनामध्ये देण्यात आल्याच्या निषेधार्थ काही अज्ञात तरुणांनी दगडफेक केली. सदर घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती शांत केली. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी दगडफेक करून फलकाची तोडफोड केली आणि पसार झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कडक बंदोबस्त ठेवला आहे.