आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्रांतीनंतर दमदार आगमन, नांदेडला मुसळधार; जालना, परभणीतही संततधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहरासह जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामध्ये वैजापूर, पैठण तालुक्याच्या काही भागात सोमवारी पावसाच्या सरी आल्या. मात्र, हा पाऊस काही समाधानकारक नव्हता. दरम्यान, मराठवाड्यातील नांदेड, जालना व परभणी जिल्ह्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात नव्या जोमाने जोरदार हजेरी
नांदेड । गेल्या आठवड्यात अर्धापूर, हिमायतनगर तालुक्यात झालेल्या विक्रमी पावसानंतर वरुणराजाने काही प्रमाणात विश्रांती घेतली. सोमवारी मात्र पावसाने पुन्हा नव्या जोमाने दमदार हजेरी लावली. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली. जिल्ह्याच्या काही भागात तुरळक हजेरी लावली. सोमवारी सकाळी तुरळक पाऊस झाल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमाराला हलक्या पावसाने हजेरी लावली. दुपारी २ वाजताच्या सुमाराला अर्धातास दमदार पाऊस झाला. दिवसभर पावसाळी वातावरण होते. सूर्यदर्शनही दुर्मिळ झाले. जिल्ह्याच्या इतर भागातही
चांगला पाऊस झाला.

जालना जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार
जालना | जून महिन्यात प्रतीक्षा करायला लावलेल्या वरुणराजाने अखेर जुलै महिन्याच्या प्रारंभीपासूनच जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हजेरी लावली आहे. चार दिवसांपासून कुठे भिजपाऊस तर कुठे संततधार होत आहे. दररोज सकाळपासूनच आभाळ भरून येत आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात कुठे दमदार तर कुठे जोरात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. जून महिन्याच्या प्रारंभी जालना, परतूर, घनसावंगी, अंबड, बदनापूर या तालुक्यांत पावसाने हजेरी लावली होती. परंतु जाफराबाद तालुक्यात पाऊस न झाल्यामुळे या परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. धरणे, मध्यम प्रकल्प, नद्या, नाले अद्यापही पाण्याने भरलेले नसल्यामुळे विहिरी, कूपनलिका, हातपंपांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. भोकरदन शहर आणि परिसरात थोड्याफार प्रमाणात पाऊस असला तरी वाकडी, कुकडी, आन्वा, जळगाव सपकाळ, पारध या परिसरात चांगला पाऊस झाला. मंठा तालुक्यातही समाधानकारक पाऊस सुरू आहे. वडीगोद्री आणि तीर्थपुरी परिसरात सकाळपासूनच रिमझिम सुरू आहे. रामनगर, सिंधी काळेगाव परिसरात हलक्याशा सरी झाल्या.

परभणीत दिवसभर संततधार
परभणी । शहरासह जिल्ह्यात रविवारी हलक्या स्वरूपात हजेरी लावलेल्या पावसाने सोमवारी दिवसभर संततधार हजेरी लावली. दुपारी व सायंकाळी प्रत्येकी अर्धा तास झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय झाले होते. या वर्षीच्या हंगामातील हा पहिलाच चांगला पाऊस असल्याने गेल्या तीन वर्षांत प्रथमच पावसाळ्याचा अनुभव परभणीकरांना आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.
जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४.५९ मिलिमीटर आहे. मागील दोन वर्षांत ५० टक्के सरासरीही गाठलेली नव्हती. गतवर्षी तर केवळ ४३ टक्केच पाऊस झाल्याने अवर्षणाची स्थिती निर्माण झाली. दोन वर्षांच्या दुष्काळानंतर या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, जूनमध्ये फारसे चांगले चित्र राहिले नाही. एक जूनपासून चार जुलैपर्यंत सरासरी १५३.२० मिलिमीटर अपेक्षित पाऊस असताना तो सोमवारी सकाळपर्यंत १२६.५० मिलिमीटर झाला आहे. अपेक्षित पावसाशी हे प्रमाण २७ मिलिमीटरने कमीच आहे.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...