आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधांचे अंधांसाठी डोळस कार्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वाळूज परिसरातील ए. एस. क्लबच्या मागे असलेल्या या पुनर्वसन केंद्राची स्थापना 5 जून 2007 रोजी झाली. हे केंद्र मुंबईतील राष्ट्रीय दृष्टिहीन संस्थेद्वारे चालवले जाते. अंध मुलींच्या वाट्याला आलेल्या दु:खांचा पाढा रडत वाचण्यापेक्षा सुखाची स्तोत्रे गायला शिकवण्याचे काम या ठिकाणी होत आहे. या व्यवसाय प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्राने आतापर्यंत शेकडो अंध मुलींना मदतीचा हात दिला आहे. त्यापैकी काही मुली चांगल्या नोकरीवर आहेत. दोघींचा डीएडला नंबर लागला आहे. खासगी कंपन्या, व्यापारी, विविध सेवाभावी संस्था आणि देणगीदारांनी या केंद्रासाठी भरभरून मदत केली आहे. या मदतीच्या बळावर पुनर्वसन केंद्रातील अंध मुली शिक्षण घेत हस्तकला, शिवणकाम, संगणक इत्यादींचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत.

या केंद्रातील अनेक मुली आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. शोभा साळवे ही मुलगी राजस्थानातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहे. पार्वती लोंढे नावाची अंध मुलगी पुणे येथे एका खासगी अंध शाळेत शिक्षिका आहे. वनिता भालेकर हिचा नाशिक येथे डीएडसाठी नंबर लागला आहे.
मोफत व्यवसाय प्रशिक्षण - या केंद्रात सध्या एकूण 26 मुली प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना संगणक, टायपिंग, द्रोण-पत्रावळी बनवणे, शिवणकाम, हस्तकला, पाकिटे तयार करणे इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. 15 ते 35 वर्षे वयोगटातील अंध मुली शिक्षण सुरू ठेवत व्यवसाय प्रशिक्षण घेत आहेत.
प्रशिक्षणातून लघु व्यवसाय - या केंद्रात अंध मुलींनी तयार केलेल्या पत्रावळी, द्रोण, पाकिटे, फाइल्स इत्यादी साहित्याची शहागंज येथील चिंतामणी एजन्सीला विक्री केली जाते. यातून मिळालेला पैसा केंद्राच्या विकासावर खर्च केला जातो. आतापर्यंत 70 हजार रुपयांच्या साहित्याची विक्री केल्याची माहिती लिपिक ज्ञानेश्वर वडकर यांनी दिली. विशेष म्हणजे भारतीय स्टेट बँकेने या प्रकल्पासाठी 4 लाख 39 हजार 400 रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे.
संघाच्या विविध शाखा - मुंबई येथील राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या राज्यभरात औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर, पुणे, जळगाव आणि सोलापूर येथे शाखा आहेत. मात्र, अंधांचे पुनर्वसन केंद्र फक्त नाशिक आणि औरंगाबाद येथेच आहे. नाशिक येथे अंध मुलांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र चालवण्यात येते. आळंदी (जि. पुणे) येथे संस्थेची अंधांसाठी स्वतंत्र पहिली ते दहावीपर्यंत शाळा आहे.
देणगीदारांच्या भरवशावर चालते केंद्र - शासकीय अनुदान नसताना हे पुनर्वसन केंद्र केवळ देणगीदारांच्या भरवशावर चालते. शहरातील रोटरी क्लब, लायन्स, लायनेस क्लब, औरंगाबाद लेडीज असोसिएशन यांच्याकडून नेहमीच वस्तुरूपात मदत मिळत असल्याचे संस्थेतील लिपिक ज्ञानेश्वर वडकर यांनी सांगितले.
अनुज्ञप्ती प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित - पुनर्वसन केंद्राचा अनुज्ञप्ती (शासकीय परवाना) प्रस्ताव एक वर्षापूर्वीच पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तालयास सादर केला आहे. मात्र, अद्यापही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही. हा परवाना मिळाल्यास संस्थेला शासकीय मदत मिळण्यास कोणतीच अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे केंद्राच्या इमारतीचे पूर्णत्व प्रमाणपत्र अद्याप सिडकोने दिलेले नाही. यासाठी संस्थेन वारंवार पाठपुरावा केला, स्मरणपत्रे दिली, तरीही सिडको प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही.
हे आहेत देणगीदार
जुगलकिशोर तापडिया : यांनी 5,300 चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली.
> हरीश बैजल (तत्कालीन सहा. पोलिस आयुक्त) : यांनी आर्थिक सहकार्य केले.
> अनिल इरावणे : यांनी जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
> स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेड : 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली.
> भारतीय स्टेट बँक : 4 लाख 39 हजार 400 रुपयांचे अर्थसाहाय्य.
> पंढरपुरातील गणेश मंडळे : अन्न-धान्याची मदत करतात.
> राजू तनवाणी : दर महिन्याला 30 किलो साखर नियमितपणे देतात.
> सतीश छाजेड आणि संतोष चोरडिया : मदत फेरीद्वारे अन्न-धान्य गोळा करून दान करतात.
चांगल्या कार्यासाठी अंधांना मदत करा - अंध मुलींचे भविष्य घडवण्याचे हाती घेतलेले सामाजिक कार्य हे केवळ देणगीदारांच्या मदतीमुळेच फुलत आहे. शासकीय मदत मिळावी म्हणून परवान्याचा प्रस्ताव पाठवला, पण वर्ष झाले तरी त्यावर निर्णय झालेला नाही. तो जर लवकरात लवकर मिळाला तर आम्हाला शासकीय मदत मिळेल व आमच्या कामाला आणखी बळ मिळेल. सोपानराव वडकर, प्रकल्प समिती सदस्य
संगणक क्षेत्रात करिअर करणार - मी औरंगाबाद तालुक्यातील राजापिंप्री येथून आले आहे. माझे आई-वडील शेती व्यवसाय करतात. सध्या मी बीए तृतीय वर्षाला शिकत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी या पुनर्वसन केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. यादरम्यान मी संगणकातील एमएस वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट शिकले आहे. मला लहानपणापासूनच संगणकाची आवड असल्याने मी संगणक क्षेत्रातच करिअर करणार आहे. संगीता पवार,विद्यार्थिनी
केवळ संगणक प्रशिक्षणासाठीच आले - मी मूळची नांदेडची असून सध्या बारावीला शिकत आहे. नांदेड येथे अंधांसाठी संगणक प्रशिक्षणाची कोणतीच सोय नसल्याने मी औरंगाबादला या केंद्रात प्रवेश घेतला. माझी संगणक शिकण्याची तीव्र इच्छा होती, ती येथे आल्यामुळे पूर्ण होत आहे. संगणकासह मला येथे टायपिंगचेही प्रशिक्षण मिळाले आहे. वनिता पोहरे, विद्यार्थिनी, नांदेड